नागपूर : ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणार नाही, लोकसंख्येनुसार ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यात झेडपीमध्ये अनेक वर्षं ओबीसींना आरक्षण आहे. 27 टक्के आरक्षण मागास प्रवर्गाला आहे. ज्या ठिकाणी एससी, एसटी आरक्षण 23 टक्के पेक्षा जास्त आहे. तिथे राजकीय आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसं आरक्षण देणं संवैधानिक नाही. तिथे आरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यानंतर सरकार सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टाला सांगितलं की ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळेल अशी व्यवस्था केली. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की जनगणनेनुसार ओबीसींची किती लोकसंख्या आहे त्याची माहिती नाही, त्यामुळे आरक्षण देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने आम्हाला याची माहिती देण्यासाठी किती वेळ लागेल याची विचारणा केली आहे. त्याची सुनावणी पुढील आठवड्यात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


दादा आताच प्रदेशाध्यक्ष झालेत, त्यांना स्थैर्य मिळू देत : मुख्यमंत्री
चंद्रकांत दादा पाटील काय बोललेत याबद्दल माझं त्यांच्याशी काही बोलणं झालं नाहीये. आमच्या पक्षात निवडून आलेले आमदार आणि केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री ठरवतात. सध्यातरी मी मुख्यमंत्री आहे. तुमची कृपा आणि आशीर्वाद असतील मी पुन्हा मुख्यमंत्री होईल. दादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत त्यांना स्थैर्य मिळू देत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयीच्या वक्तव्यावर भाष्य केलं. माझ्या राजकीय जीवनात पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पार पाडण्याचे काम केले आहे. मी आजवर कोणत्याही पदासाठी इच्छुक किंवा दावेदार नव्हतो. मात्र, माझ्या कामाच्या जोरावर मला महत्वाची पदं मिळत गेली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यास मी ती का सोडेन असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

आमच्या काही जागा शिवसेनेला तर त्यांच्या काही जागा आमच्याकडे येतील
माझ्या प्रत्येक सभेत मी युतीबद्दल बोलतोय. महायुतीचं सरकार आणा असं सभांमध्ये सातत्यानं बोलतोय. आम्ही आधी इतर घटक पक्षांच्या जागा ठरवू त्यानंतर आमच्या म्हणजे शिवेसेनेसोबतच्या जागांचं ठरवू, असे मुख्यमंत्री म्हणाले.  आमच्या मित्रपक्षांच्या जागा सोडून सेना - भाजपमध्ये निम्म्या जागांचं वाटप होईल. पण आमच्या दोघांमधील सिटिंग जागांमधल्या काही जागा सोडून आम्ही वाटप करू, असेही ते पुढे म्हणाले. त्यात आमच्या काही जागा त्यांना जातील तर त्यांच्या काही जागा आमच्याकडे येतील, असेही त्यांनी सांगितले.

 मतं ईव्हीएम नाही तर मतदार देतात, विरोधी पक्ष भरकटलाय
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपनं कायम एक तत्व पाळलं. आमची विरोधात असतांना संघर्ष यात्रा आणि सत्तेत आलो तर संवाद यात्रा असते. आम्ही नागरिकांशी संवाद करतोय तर विरोधी पक्ष ईव्हीएमशी संवाद करत आहेत, असे ते म्हणाले. मतं ईव्हीएम नाही तर मतदार देतात. इतका हताश, निराश आणि मुद्द्यांपासून भरकटलेला विरोधी पक्ष आजपर्यंतचा इतिहासात पहिला नाही, असे ते म्हणाले. जनतेशी नाळ तुटलेली विरोधी पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेच्या स्वागतासाठी नागपूरच्या सेन्ट्रल एव्हन्यू रोडवर जय्यत तयारी केली होती.