नागपूर : प्रधानमंत्री  पीक विमा योजना खरीप हंगामांतर्गत  प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखीमीच्या बाबीअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अधिसूचना जारी केली आहे. 1 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम  देण्याची तरतूद आहे.


अधिसूचनेत प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसूचित पिकांकरीता तरतूद असून पर्जन्यमानातील असाधारण कमी व जास्त प्रमाण असेल तर इतर नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती ज्यामूळे पीक पेरणी 25 टक्केपेक्षा जास्त बाधित झाली असल्यास रक्कम मिळणार आहे.


पीकांचे उत्पादन 50 टक्के कमी


नागपूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली असून या कालावधीत जिल्ह्यात एकूण सरासरीपेक्षा 46.4 टक्के पावसाची जास्त नोंद आहे. जिल्ह्यातील 70 महसूल मंडळात जास्त पावसाची नोंद झाली असून अतिवृष्टी झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत सुयुक्त सर्वेक्षण करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठविण्यात आला असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ  व पीक विमा कंपनी यांनी जिल्ह्यातील सोयाबीन, तूर व कापूस पिकांचे उत्पादन 50 टक्केपेक्षा कमी येणार असल्याचे नमूद केले आहे. राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनी यांच्या संयुक्त पाहणीनूसार नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसान भरपाई निश्चित केली जाईल, अशी तरतूद असल्याने त्यानुसार मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि पीक विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीद्वरे पीक नुकसानीची यादुच्छिक पध्दतीने सर्वेक्षण व संयुक्त पाहणी करण्यात आली त्यानुसार अधिसूचित महसूल मंडळात बाधीत पिकांचे येणारे उत्पादनानुसार त्या पिकाच्या मागील 7 वर्षाच्या सरासरी 50 टक्केपेक्षा कमी असल्यामुळे नुकसान भरपाईस पात्र आहेत.


25 टक्के आगाऊ रक्कम देण्याचे नमूद


अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन, तूर व कापूस या पिकासाठी, पीक विमा योजनेच्या तरतूदीच्या अधिन राहून संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी , मानिकचंद आयकॉन 3 रामाळा, बंडगार्डन, पुणे यांनी आदेशित करण्यात आले आहे. या आदेशानुसार विमा कंपनीने अधिसूचना जाहीर झाल्यापासून 1 महिन्याच्या आत तरतूदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन, तूर व कापूस या पिकांकरीता जिल्हयातील अधिसूचित महसूल मंडळातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या  25 टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी, असे नमूद आहे. जोखीमेंतर्गत बाधित अधिसूचित क्षेत्रातील सोयाबीन, तूर व कापूस पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर अधिसूचित विमा क्षेत्रातील पिकाच्या विमाधारक शेतकरी हे पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील, असे अधिसूचनेत नमूद आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


High Court : ट्रस्टकडे हत्तीच्या देखभालीची जबाबदारी; वास्तविकता पुढे आणा, न्यायालयाचे निदेंश


नागपूरचे उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी ठरत आहे मृत्यूचा सापळा? दोन अपघातात पाच जणांचा मृत्यू