नागपूर : अवयवदानाच्या जगृनजातीची समाजात मोठी गरज आहे. अनेकांची इच्छा असूनही अवयवदान करताना अनेक अडचणी यामध्ये येतात. त्यामुळे अवयवदान करण्याची इच्छा असेल तर त्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर ही बाब नमूद करण्याची सोय केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  दिली आहे.


'माय मेडिकल मंत्रा' या वेबसाईटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थित होते. आज नितीन गडकरी यांनी अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार केला. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतुकीदरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सहा तासांच्या आत अवयवदान करता यावी याची सोय केली जाणार आहे. तसेच इच्छुक अवयवदात्यांची ड्रायव्हिंग लायसन्सवर नोंद करण्याची सोयही केली जाणार आहे.


गडकरींच्या निर्णयाचं उपस्थितांची मोठ्या आनंदाने स्वागत केलं. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लक्ष्मी गुप्ता यांना आपल्या 24 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर अवयवदानासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. 2016 सालच्या या घटनेने लक्ष्मी यांच्या डोळ्यात आजही अश्रू येतात. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कारानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रावर आपल्या मुलाचा फोटो पाहून लक्ष्मी यांना होणारं दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.


भारतात अवयवदानाचं प्रमाण फार कमी आहे. वेळीच अवयव न मिळाल्याने दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अवयवदानाचा दर वाढवण्यासाठी समाजात जगृनजाती होणं फार गरजेचं आहे. मात्र वाहतूक खात्याचा हा निर्णय खरंच अमलात आला तर तो अनेकांसाठी जीवनदार ठरू शकेल.