नागपूर : सना खान प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत असून नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या प्रकरणी मुख्य आरोपी अमित साहू विरोधात आणखी एक गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सना खान (Sana Khan) प्रकरणात हनी ट्रॅपचा (Honey Trap) नवा अँगल समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी हनी ट्रॅपच्या नव्या प्रकरणात अमित साहू आणि त्याचे नागपूर आणि जबलपूरमधील काही सहकारी अशा अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


सना खान अपहरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. मात्र, आता त्याच प्रकरणात हनी ट्रॅपचा नवा आरोप समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित साहू आणि त्याच्या काही अज्ञात सहकाऱ्यांच्या विरोधात नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवत हनी ट्रॅप केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, हनी ट्रॅपच्या प्रकरणात आरोपींनी सना खान यांचा वापर केला की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.


हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल


अमित साहू आणि त्याचे सहकारी पीडित महिलेला काही लोकांकडे पाठवून त्यांच्या संबांधाचे व्हिडीओ बनवून खंडणी वसूल करत होते, अशी तक्रार आपल्याकडे आली, त्यानंतर आपण या प्रकरणी तपास करुन हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकार नागपूरसह जबलपूर आणि इतर काही ठिकाणी घडले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.


दरम्यान, पोलिसांनी हनी ट्रॅपचा गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप एकही पीडित पोलिसांकडे तक्रार घेऊन आलेला नाही. त्यामुळे बदनामीची भीती आणि गुन्हेगारांकडून मिळणाऱ्या धमक्या या कारणामुळे आधीच लाखो रुपयांची खंडणी देणारे अनेक व्यापारी आणि राजकीय व्यक्ती या प्रकरणी मूग गिळून गप्प आहेत. त्यामध्ये फक्त नागपूर किंवा जबलपूरमधील लोकांचा समावेश नाही तर अनेक राज्यात पीडित असल्याची शंका पोलिसांना आहे. 


सध्या तपास खूप प्राथमिक स्तरावर आहे, हनी ट्रॅप प्रकरणातील पीडित अद्याप तक्रार घेऊन पुढे आलेलं नाही. तपास पुढे गेल्यावर समोर गेल्यावर सत्यता समोर येईल, पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले.


जबलपूरमधून धर्मेंद्र यादवला बेड्या


दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी जबलपूरमधून धर्मेंद्र यादव नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तो जबलपूरचा सराईत गुन्हेगार असून 2 ऑगस्टला सना खान यांची अमित साहूने हत्या केल्यानंतर धर्मेंद्र यादव आणि अमित साहू सतत एकमेकांच्या संपर्कात होते. 


धर्मेन्द्र यादव याने सना खान यांचे अनेक मोबाइल फोन तसेच अमित साहूचे मोबाईल फोन लपवण्यात अमित साहूला मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली आहे. धर्मेंद्र यादव च्या मदतीने लपवण्यात आलेल्या मोबाईल फोनमधून या प्रकरणाचे पुढचे धागेदोरे समोर येऊ शकतात अशी अपेक्षा पोलिसांना आहे.


हेही वाचा


Sana Khan Update : सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, मृतदेहाची विल्लेवाट लावणाऱ्या महेंद्र यादवला बेड्या; मृतदेहाचा शोध सुरूच