नागपूर : राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजप पक्षांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शरद पवारांना केला. मात्र कुणावर दबाव टाकून पक्षात घ्यावं, अशी भाजपची स्थिती सध्यातरी नाही. उलट आपले नेते पक्ष सोडून का जात आहेत? याचं शरद पवारांना आत्मचिंतन करावं, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना दिलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते, आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र सगळ्यांना आम्ही पक्षात घेणार नाही. ईडीची चौकशी सुरु असलेल्या नेत्यांना पक्षात घेतलं जाणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
भाजपची ताकद आता वाढली आहे. कुणाला पक्षात बोलावण्याची वेळ भाजपवर नाही. लोकांच्या मागे धावण्याची गरज सध्या भाजपला नाही. लोक आमच्याकडे येतात, त्यातील जे चांगले आहेत, लोकाभिमुख आहेत त्यांना आम्ही पक्षात नक्की घेऊ. मात्र दबावाचं राजकारण करण्याची भाजपला गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
उलट भाजप सरकारने अनेक अडचणीतील कारखान्यांना सरकारच्या माध्यमातून मदत केली. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांची यादी मोठी आहे. पक्षात घेण्यासाठी त्यांना मदत केलेली नाही, त्यामुळे शरद पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपले लोकं सोडून का जात आहेत याचं आत्मचिंतन करावं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पवारांना दिला.
काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची सत्ताधारी पक्षाने एसीबी चौकशी लावली आहे. त्यामुळे त्यांनी दबावामुळे, भीतीपोटी राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. लोकशाहीला आघात करण्याचा हा प्रकार आहे, असा घणाघात शरद पवारांनी केला.