नागपूरः कर्जाची नियमित परतफेड करणारा कोणताही लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहू नये आणि कोणत्याच परिस्थितीत चुकीच्या माणसाला लाभ मिळू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना पुणे येथील सहकार विभागाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानदेव मुकने यांनी दिल्या. तालुका उपनिबंधकांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विशेष लक्ष घालण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अचूक पद्धतीने राबविण्यासाठी शासनाच्या अमरावती व नागपूर विभागातील जिल्हा उपनिबंधक व अधिनस्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नागपूर येथे घेण्यात आले. योजनेअंतर्गत मागिल तीन वर्षात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे.
प्रोत्साहनपर 50 हजारांचे अनुदान
राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेअंतर्गत कर्जमुक्ती दिली होती. मात्र, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना देखील जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत सन 2017-18, सन 2018-19,सन 2019-20 या तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांनी किमान दोनदा परतफेड केली आहे. त्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे आहे. या योजनेची कशा पद्धतीने ऑनलाईन अंमलबजावणी करायची याबाबतचे आज प्रशिक्षण देण्यात आले. पुणे येथून आलेले सहकार विभागाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानदेव मुकने व अन्य अधिकाऱ्यांनी या संदर्भातील आज प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले.
Eknath Shinde : नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
पात्र लाभार्थी वंचित राहू नये याची काळजी
सहकार विभागाने या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. परतफेड करणारा कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. आणि कोणत्याच परिस्थितीत चुकीच्या माणसाला लाभ मिळू नये, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तालुका उपनिबंधकांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विशेष लक्ष घालण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नागपूरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अधिकारी गौतम वालदे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हा उपनिबंधक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सु्प्रिया सुळे यांच्या मतदारसंघात मनसेचा झेंडा फडकवा; राज ठाकरे यांनी दिली वसंत मोरे यांना नवी जबाबदारी
योजनेबद्दल...
महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची उपजीविका मुख्यतः शेती आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. फळे व इतर पारंपारिक पिकांची लागवड करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
कोणाला वगळण्यात येणार?
आयकर भरणारे शेतकरी आणि सरकारी नोकरीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँकेत खाते नसेल, तेही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.