नागपूरः सोशल मीडियाच्या काळात आपणी अपडेट राहावे डिजीटल मीडियावर चमकोगिरी करता यावी म्हणून नागपूर महानगरपालिकेकडून एका खासगी एजन्सी वर महिन्याकाठी लाखो रुपये आणि एक खासगी सोशल मीडिया समन्वयकाच्या मानधनावर सुमारे 25 हजार रुपये खर्च करण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात सोशल मीडिया आणि मोबाईल अॅप्लिकेशनवर आलेल्या तक्रारींवर कुठलीही कारवाई न करता तक्रार थेट 'क्लोज' करत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणात तक्रारदाराशी संपर्क साधण्याचे कष्टही न घेता तक्रार अधिकाऱ्याने 'क्लोज' केली आहे, हे विशेष.


एकीकडे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर दुसरीकडे सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यात पाणी साचून डबक्याचे स्वरुप या रस्त्यांना आले आहे. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाजही लागत नसल्याने दररोज शहरात अनेक अपघात घडत आहेत. तर अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहे. मात्र हे सोडविण्याची जबाबदारी असलेल्या नागपूर महानगरपालिकेकडून समस्या सोडविण्याचा देखावा करत फक्त सोशल 'चमकोगिरी' करण्यात येत असल्याची तक्रार नागपूर सिटीझन फोरमचे रजत पडोळे यांनी केली आहे. शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर सिटीझन फोरमच्यावतीने  'खड्डे दाखवा, मनपा प्रशासन जागवा' अभियान राबवून प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न करण्यात आले. 


'खड्डे दाखवा, मनपा प्रशासन जागवा


शहरातील एकता कॉलनी, अयोध्यानगर, वाडी रोड, यादवनगर येथे 'खड्डे दाखवा, मनपा प्रशासन जागवा अभियान राबविण्यात आला. या अभियानात परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येत सहभागी झाले. नागरिकांनी शहरातील विविध भागात खड्ड्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत नागपूर महानगरपालिकेला टॅग केले. या संदर्भात तक्रारही नागपूर सिटीझन फोरमचे रजत पडोळे यांनी नागपूर लाईव्ह या मनपाच्या तक्रार सोडविणाऱ्या अॅपवर 7 ऑगस्ट रोजी केली. यावर मनपा प्रशासन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याप्रमाणे तत्काळ कारवाई करणार अशी अपेक्षा होती. मात्र कुठलीच कारवाई न करता 'क्लोज' करण्याचा प्रताप संबंधीतांकडून करण्यात आला असल्याचे पडोळे यांनी सांगितले.


खड्ड्यांची पूजा अन् नामाकरणही


यापूर्वीही 2021मध्ये नागपूर सिटीझन फोरमच्यावतीने मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मानस चौक, स्वावलंबीनगर, रहाटे कॉलनी येथे रस्त्यावरील खड्ड्यांची पुजा आणि आरती करण्यात आली होती. यासोबतच खड्ड्यांना नावही देण्यात आले होते. त्यावेळीही प्रशासनाने काही ठिकाणी कारवाई केली होती. मात्र यंदा महानगरपालिकेवर प्रशासक असल्याने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Nagpur Crime : निर्मल उज्ज्वलमध्ये 2.80 कोटींचा घोटाळा, संचालक मंडळावर गुन्हा दाखल


प्रकरणाची चौकशी करु, गरज पडल्यास कारवाईः मनपा आयुक्त


या संदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी संपर्क साधला असता, या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतर गरज पडल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या आलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी एक यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्याद्वारे ही तक्रार कोणी हाताळली यासंदर्भात माहिती घेऊन पुढे काही बोलता येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.


RTMNU Exams : अतिवृष्टीमुळे पुन्हा आज आणि उद्याच्या नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द, 'या' हेल्पलाईन क्रमांकावर साधा संपर्क