नागपूरः निर्मल उज्ज्वल क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीत एक घोटाळा लपविण्यासाठी दुसरा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणात सुरुवातीला व्यवस्थापकावर पूर्ण जबाबदारी ढकलण्यात आली, मात्र नंतर त्याला आणि सोसायटीचे नाव वाचविण्यासाठी पुन्हा घोटाळा करण्यात आला. अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत होती. अखेर रविवारी नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींमध्ये निर्मल उज्ज्वलच्या कामठी शाखेचे व्यवस्थापक सचिन प्रकाश बोंबले, सोसायटी सचिव आणि संचालक मंडळ व इतरांचा समावेश आहे.


शांतीनगर निवासी कुणाल नंदकिशोर येळणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कुणाल यांचे परिचित बापू मेंढे आणि मनीष घवघवे यांनी 2017 मध्ये निर्मिल उज्जवल बँकेच्या कामठी शाखेतून 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. 35 आणि 20 लाखांची दोन मुदत कर्जे होती. तर 15 लाख रुपयांचे रोख क्रेडिट (सीसी) जारी करण्यात आले होते. तत्कालीन बँक शाखेचे व्यवस्थापक सचिन बोंबले यांनी घवघवेची क्रेडीट लिमिट 85 लाख केली आणि त्यांच्या नावावर 60 लाख रुपये काढले. घवघवे यांच्यासह रामेश्वर बावणकर, बाबा रेडीमेड, इंदू अॅन्ड नरेंद्र मनचंदानी आणि सलमान छवारे यांच्या नावावर एकूण 3.46 कोटी रुपये काढण्यात आले. सप्टेंबर 2018 मध्ये कुणाल यांनी बँकेत 1 कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला. त्यावेळी सचिव मानमोडे यांनी त्यांना भेटायला बोलावले. त्यांना माहिती होते की, कुणाल आणि मनीषचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी सचिनने केलेला गैरव्यव्हार बाहेर आला तर बँकेचे नाव खराब होईल असे त्यांनी कुणालला समजावत एक ऐवजी अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास म्हटले आणि उर्वरित रक्कम सचिनच्या खात्यात टाकण्यास सांगितले.


एक वर्षाच्या तपासानंतर गुन्हा दाखल


कुणालने आपल्या जमिनींचे कागदपत्र जमा करून कर्ज घेतले. त्यानंतर फेब्रुवारी 2019मध्ये मानमोडे यांनी पुन्हा कुणालला बँकेतून 2.50 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास सांगितले. त्यावेळी कुणालकडे गहाण ठेवण्यासाठी काहीही नव्हते. सचिनच्या नावावर मदतीचा करारनामा तयार करण्यात आला. कुणालने गहाण ठेवलेल्या जमिनीवर सचिन लेआऊट टाकून पूर्ण रक्कम बँकेला परत करेल असा करार झाला. 7-8 हप्ते भरल्यानंतर सचिनने हप्ते भरणे बंद केले. कुणालने मानमोडे, त्यांची पत्नी आणि बँक व्यवस्थापकाची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण तत्काळ निपटवून त्यांनी गहाण ठेवलेली मालमत्ता सोडविण्यास सांगितले. मात्र सर्वांनी टाळाटाळ सुरू केली. घोटाळा लपविण्यासाठी कुणालला अडकविण्यात आले आणि त्यांच्या नावावर 2.80 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. कुणालने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास सुरू केला. जवळपास 1 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होते. त्यानंतर नुकताच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.


भाड्यानं घर घेतल्यास तुम्हाला 18% GST भरावा लागणार? सरकारनं स्पष्टच सांगितलं