Nagpur Crime News Updates: नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात धमकी देणाऱ्या आरोपी सध्या नागपुरात (Nagpur) तुरुंगात असून तिथंच त्यानं गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. आरोपी जयेश पुजारी (Jayesh Pujari) यानं तुरुंगातच आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. आरोपी जयेश पुजारीनं लोखंडी तार गिळल्याचं सोनोग्राफीत समोर आलं आणि जेल प्रशासनासह सर्वांचीच झोप उडाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देऊन खंडणी मागण्याच्या प्रकरणातला आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर उर्फ कांथानं काल (शुक्रवार) तुरुंगात मोठा गोंधळ घातला. जयेशनं त्याच्या बैरक समोर लोखंडी गजांना लावलेल्या बारीक तारेचे काही तुकडे खाल्ले आणि नंतर मी लोखंडी तार खाल्ली, असा कांगावा केला.
जेल प्रशासनानं लगेच त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेऊन तपासणी केली. त्याची सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये तारेच्या जाळीचा अत्यंत बारीक तुकडा पोटात दिसून आला. मात्र तो धोकादायक नसून नैसर्गिक पद्धतीनं शौचाद्वारे बाहेर निघेल, अशी सूचना डॉक्टरांनी केली आणि जेल प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर जयेश उर्फ शाकीर उर्फ कांथाला पुन्हा जेलमध्ये आणण्यात आलं आहे.
गेले अनेक दिवस जयेश उर्फ शाकीर पुन्हा त्याला बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात यावं, अशी मागणी करत आहे आणि त्यासाठीच त्यानं हा गोंधळ केला असावा, असा संशय जेल प्रशासनाला आहे. डॉक्टरांनी तपासून त्याच्या जीवाला कुठलाही धोका नाही, असा रिपोर्ट दिल्यामुळेच त्याला लगेच रुग्णालयात तपासणी करून पुन्हा जेलमध्ये परत आणणल्याची माहिची जेल प्रशासनानं दिली आहे.
जयेश पुजारीनं धमकी देत केलेली खंडणीची मागणी
बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीनं फोन केला होता. यावेळी त्यानं पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीनं दिली होती. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी यानं बऱ्याच आधी धर्म परिवर्तन केलं असून धर्म परिवर्तनानंतरचं त्याचं नाव शाकीर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, त्याचे काही कट्टरपंथी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nagpur : कॉलेजला निघालेल्या तरुणीवर अत्याचार, निर्जनस्थळी झुडपात नेऊन कृत्य, नागपूर हादरलं