Nitin Gadkari Threat Case: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करुन खंडणी मागणारा आरोपी आणि कुख्यात गँगस्टर जयेश पुजारी (Jayesh Pujari) याला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आलंय. काल रात्री नागपूर पोलिसांचं विशेष पथक विमानाने जयेश पुजारीला बेळगावला सोडायला गेलं होतं. जयेश पुजारीविरोधात कर्नाटकात अनेक गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांचाही तपास सुरु आहे.त्यामुळे कर्नाटकातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी जयेश पुजारीला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 


भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकीच्या प्रकरणी जयेश पुजारी (Jayesh Pujari) आणि त्याच्या साथीदारांविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणात चार्जशीट झाली असून जयेश पुजारीचा नागपुरातील चौकशीचा भाग पूर्ण झाला आहे. तसेच जयेश पुजारी विरोधात कर्नाटकात अनेक गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांचा तपास ही सुरू आहे.अनेक प्रकरण कर्नाटकातील न्यायालयात जयेश पुजारी आणि त्याच्या सहकारी दहशतवाद्यांना विरोधात सुरू आहेत.त्यामुळे कर्नाटक मधील प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी जयेश पुजारीला पुन्हा बेळगाव जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे.


बेळगावच्या तुरुंगाचा अट्टाहास कशापाई?


दरम्यान, जयेश पुजारीनं स्वतः नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याला नागपूरच्या जेल ऐवजी बेळगावच्या जेलमध्ये ठेवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका काही दिवसांपूर्वी केली होती. जयेश पुजारीला बेळगावच्या जेलमध्ये कशा पद्धतीने विविध सोयीसुविधा, इंटरनेट असलेला मोबाईल फोन आणि चमचमीत खाद्यपदार्थ मिळत होते, हे यापूर्वीच्या तपासात पुढे आले होते. त्यामुळे जयेश पुजारी पुन्हा त्याच बेळगावच्या तुरुंगात आपल्या इतर सहकारी दहशतवाद्यांच्या सोबतीला गेल्यानंतर पुन्हा त्याचे तसेच कृत्य सुरू तर होणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.


यापूर्वी देखील केले होते अनेक नाट्यमय प्रकार 


दहशतवादी जयेश पुजारीने यापूर्वी देखील नागपूरच्या जेलमध्ये अनेक नाट्यमय प्रकार केले होते. नागपूरच्या जेलमधील बराकमध्ये असताना तिथल्या लोखंडी गजांना लावलेल्या बारीक तारीचे तुकडे गिळून मी लोखंडी तार खाल्ल्याचा कांगावा केला होता.मात्र जेल प्रशासनानं लगेच त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेऊन तपासणी केली असता तपासाअंती ही तार नसून बारीक तुकडे असल्याची निष्पन्न झाले होते.जयेश पुजारीनं धमकी देत  खंडणीची मागणी केली होती.


खंडणीसाठी दोनदा केले होते फोन


जयेश पुजारी बेळगावच्या तुरुंगात कैद असताना 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीनं दोनदा फोन केला होता. यावेळी त्यानं पहिल्यांदा 100 कोटी आणि दुसऱ्यांदा 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी जयेश पुजारीनं  दिली होती. या प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी यानं बऱ्याच आधी धर्म परिवर्तन केलं असून धर्म परिवर्तनानंतरचं त्याचं नाव शाकीर असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, त्याचे काही कट्टरपंथी संघटनांशी देखील संबंध असल्याचेही समोर आलं होतं.