Nitin Gadkari : नागपुरात (Nagpur) 9 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शहरातील अनेक भाग जलमय झाले. अनेक वसाहतींमध्ये पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात एका महत्त्वपूर्ण बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. गडकरींनी नियोजन भवनात घेतलेल्या या बैठकीस महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास (NIT), जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी यांनी “जर नालेसफाई वेळेवर आणि योग्य प्रकारे झाली असती, तर शहरात पाणी साचण्याची वेळ आलीच नसती. मग एवढ्या भागांमध्ये पाणी कसं साचलं? नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का?” असा सवाल अधिकाऱ्यांना उपस्थित केला.  तसेच गडकरींनी या बैठकीत  “सात दिवसांत शहरात झालेल्या नुकसानीचा स्पॉटनिहाय अहवाल तयार करून सादर करा, आदेश देखील अधिकाऱ्यांना दिले.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

दरम्यान, बेसा, बेलतरोडी, मनीष नगर या भागांतील पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याची माहिती समोर आली होती. यावर गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या भागात अनधिकृत बांधकामामुळे पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले का? असा सवाल विचारत अनधिकृत बांधकामे काढून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.  

गुजरातच्या पूल दुर्घटनेवरून नितीन गडकरींचा इशारा

दरम्यान, गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील महिसागर नदीवरील पूल कोसळून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना माफ केले जाणार नाही. “मी अशा लोकांच्या मागे लागलो आहे आणि त्यांना सोडणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. गडकरी म्हणाले की, अपघात ही एक वेगळी बाब आहे, पण जे जाणीवपूर्वक कामात बेइमानी करतात किंवा भ्रष्टाचार करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. जर चूक अनवधानाने झाली असेल, तर त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाऊ शकतो; परंतु जर ती चूक दुर्भावनापूर्ण हेतूने केली गेली असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई अपरिहार्य आहे. कामात जर काही गडबड झाली, तर मी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना कधीच सोडत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “रस्त्याच्या कामात चूक झाली असेल, तर मी जबाबदार लोकांना फटकारतो आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करतो,” असेही ते म्हणाले. 

आणखी वाचा 

Ujjwal Nikam: लोकसभेला पराभव अन् राज्यसभेला पुनर्वसन! उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती