Naxal:  प्रशासनाच्या उपाययोजन आणि पोलिसांच्या कारवाईमुळे मागील काही वर्षात नक्षलवादी कारवायांमध्ये घट झाली आहे. नक्षलवादी चळवळीतील अनेक नेत्यांना अटक अथवा चकमकीत ठार केल्याने नक्षली चळवळ कमकुवत झाल्याचे म्हटले जात असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. नक्षलवादी पोलिसांच्या विरोधात पुलवामा दहशतवादी हल्ल्यासारखा घातक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.  महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात एका जहाल नक्षलवाद्याला तिथल्या पोलिसांनी अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.


तेलंगणा पोलिसांनी या जहाल नक्षलवाद्याला अटक केली. त्याची मागील एक महिन्यापासून चौकशी सुरू आहे. एका महिन्याच्या चौकशीतून ही आणि इतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक झालेल्या नक्षलवाद्याने तेलंगणा राज्यातील पोलिसांना दिलेल्या माहितीत नक्षलवादी खास "डायरेक्शनल माईन्स" तयार करण्याचे प्रयत्न करत असल्याचे कबूल केले आहे. चौकोनी आकाराच्या बॉक्सेसमध्ये स्फोटक ठेवून ते ट्रॅक्टर किंवा बोलेरो सारख्या वाहनाच्या माध्यमातून दुर्गम भागातील पोलिसांच्या सशस्त्र चौक्यांवर धडकवण्याची नक्षलवाद्यांची योजना असल्याचे समोर आले आहे. 


याशिवाय नक्षलवादी "लोडेड ड्रोन" हल्ल्याच्याही तयारीत असल्याचे अटक झालेल्या जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांना सांगितले आहे. गडचिरोलीसह छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या हेरगिरीसाठी अनेक वेळेला ड्रोनचा वापर यापूर्वी केला आहे. मात्र, आता पहिल्यांदा नक्षलवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांवर स्फोटकांच्या मदतीने हल्ला चढवण्याच्या योजनेवर काम सुरू केल्याचे अटक झालेल्या जहाल नक्षलवाद्यांने तिथल्या पोलिसांना सांगितले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी काश्मीरमध्ये श्रीनगरमधील हवाई तळावर अशाच पद्धतीने ड्रोन हल्ला झाला होता. नक्षलवादी बाईकवर स्वार होऊन येणाऱ्या "पैरा टीम्स"च्या हल्ल्याचे ही नियोजन करत असल्याचे या तपासात समोर आले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगणाचे पोलीस सावध झाले आहे. 


नोट बदलीसाठी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर हालचाली, पोलिसांची करडी नजर


दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयानंतर माओवादी दोन हजारच्या नोटांची बदली करण्यासाठी धडपड करतांना दिसत आहे. रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना सहा लाखाच्या किमतीच्या नोटांची बदली करतांना अटक करण्यात आली. त्या तपासात माओवादी दोन हजाराच्या नोट बदलीसाठी कंत्राटदार व व्यापाऱ्यांवर दबाव टाकत आहे. धक्कादाय बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथून  छत्तीसगडच्या शिलगर येथील नक्षल समर्थक आंदोलनाला पैसे पाठवत असल्याचे पुढे आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं पोलिसांची या सर्वांवर बारीक पाळत असल्याचं महाराष्ट्र नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितलं आहे.