नागपूर : सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख  ( Anil Deshmukh ) नागपुरात दाखल झाले आहेत. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आज प्रथमच ते नागपुरात दाखल झाले आहेत. या निमित्ताने नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनर उभारण्यात आलेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील करण्यात आली. देशमुख यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आल्याचा आरोप केला.  


"21 महिन्यानंतर मी माझ्या नागपूर गावात येतोय. याचा मला अतिशय आनंद आहे. मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं होतं. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून मोठा आनंद झालाय. मी काटोल मतदार संघात नव्हतो. परंतु, मुलगा सलील हा कायम नागरिकांच्या संपर्कात होता, असे अनिल देखमुख यांनी नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर म्हटले. 


अनिल देशमुख यांच्या आगमनामुळे नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. विमानतळावर दाखल होतात कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांचं फटाके वाजवून, ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांचं प्रेम आणि स्वागत पाहून अनिल देशमुख भावनिक झाले. कार्यकर्त्यांच प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. जंगी स्वागताबद्दल अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. 


जंगी स्वागत


अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. 2021 मध्ये अटकेनंतर तब्बल 14 महिन्यांनी अनिल देशमुख हे नागपुरात दाखल झाले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. नागपूर विमानतळापासून त्यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली काढत फुलांचं वर्षाव करत जी पी ओ चौकापर्यंत स्वागत रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान अनिल देशमुख यांनी मार्गातील साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्याशिवाय व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आणि संविधान चौकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करत ते घराकडे रवाना झाले. 


वर्षभरानंतर तुरूंगातून सुटका


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पोलिस महासंचालकांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांच्या खंडणी वसूल करायला लावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी अनिल देशमुख यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक झाली होती. त्यानंतर ते जवळपास 14 महिने तुरूंगात होते. अखेर वर्षभरानंतर त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता. परंतु, कोर्टाने त्यांना मुंबई सोडून बाहेर जाण्यास परवानगी नाकारली होती. पण त्यानंतर झालेल्या सुनावणीत अनिल देशमुख यांनी मुंबई सोडून नागपूर जाण्यासाठी परवानगी मागितली होती. कोर्टाने देशमुखांची ती परवानगी मान्य करत नागपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे आज देशमुख नागपुरात दाखल झाले.