नागपूरः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं विघ्न असून ते दूर व्हावं म्हणून आम्ही संकटमोचन हनुमानाकडे प्रार्थना करत आहोत, अशी टीका 36 दिवसानंतर विदर्भात परतलेल्या खासदार नवनीत राणा (Navneed Rana) यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणासंदर्भात नाट्यमय घडामोडीनंतर खासदार नवनीन राणा आणि आमदार रवी राणा यांचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर दोघांनीही रामनगर परिसरातील पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात चालीसा पठण केले. मंदिराच्या दिशेने येताना पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला होता, असा आरोप यावेळी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला.
यानंतर माध्यमांशी संवाद साधनाता नवनीन राणा म्हणाल्या, मुख्यमंत्री विदर्भातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, लोडशेडींग, बेरोजगारी या संदर्भात मुख्यमंत्री यांनी किती बैठकी घेतल्या याचा खुलासा करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे नेते देखील हनुमान चालीसा पठण करणार आहेत याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी, प्रत्येकाला पुजेचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार पुजन करावे याला आपला विरोध नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
वाचाः Hanuman Chalisa : राणा दाम्पत्यांचं नागपुरात हनुमान चालिसा पठण; राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता
राणा दामपत्याचा व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवेदकाने हनुमान यांच्या बद्दल काही प्रश्न विचारले असता राणा दामपत्याची भंबेरी उडाली होती. हनुमान यांचा नाव हनुमान कसं पडलं. त्यांचे पूर्वीचे नाव काय होते, असे प्रश्न मुलाखतीत विचारले असता. दोघांनाही याचे उत्तर आले नसल्याचे दिसून येत होते. आज नागपूरात हनुमान चालीसा पठनाच्या घटने निमित्त हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजला.
वाचाः राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा पठणाची परवानगी, अटींचे पालन करून उद्या नागपुरात होणार पठण
नागपूरच्या युवकासोबतचाही संवाद व्हायरल
मला हनुमान चालीसा पठन न करण्यासाठी दबाव आणला जात असून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी दिल्लीत पोलिसांकडे नोंदविली होती. हा फोन करणारा नागपूरचा असल्याची चर्चा सोशल मिडीयावर होती आणि त्याने नवनीन राणा आणि रवी राणा या दोघांनाही फोन करुन "तुम्ही हनुमान चालीसा पठन करा, पाच लाख लोकं लाईव्ह आहेत" असा एक ऑडिओ कॉलची रेकॉर्डिंगही व्हायरल झाली आहे.
पोलिसांच्या व्यूह रचनेला यश
राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीनेही हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नोटीस पाठवून चोख बंदोबस्त केल्यामुळे राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पठन करता आले.