नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी होणारा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. नागपूरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच हवामान विभागाने येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
नागपूरात शनिवारी पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यानचा 11 किलोमीटरच्या रिच 3 च्या टप्प्यातील प्रवासी सेवेचे उदघाटन करणार होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी सुभाषनगर मेट्रो स्टेशनवरून सीताबर्डी दरम्यान मेट्रोवारीही करणार होते. संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मोदी हे मानकापूर क्रीडा संकुलात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात मेट्रोसह इतर अनेक प्रकल्पांशी संबंधित उद्घाटन करणार होते. मात्र, आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
सुरुवातीला रिमझिम असलेला पाऊस दुपारी दीडच्या सुमारास दमदारपणे कोसळू लागला आणि अवघ्या दीड तासांच्या पावसानंतर नागपुरात अनेक रस्त्यांवर गुडघाभर तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले. लोकांच्या दुचाकी पाण्याच्या मधोमध बंद पडू लागल्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटनाही घडल्या. उद्यादेखील नागपुरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता. उद्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
उद्या पंतप्रधानांच्या ताफ्यासाठी तब्ब्ल 22 ठिकाणी वाहतूक थांबवण्याचे ठरवण्यात आले होते. तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर करत वाहतूक वळवण्याचे निर्णयही घेतले गेले होते. त्यामुळे आज एक ते दीड तासांच्या पावसानंतर नागपुरात प्रशासनिक तयारीची पोलखोल झाल्यानंतर उद्या अतिवृष्टीचा इशारा असताना पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान काय स्थिती होईल? याची चर्चा नागपुरात सुरु झाली होती. तेव्हा अचानक पंतप्रधानांचा नागपूर दौरा हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले. आता पंतप्रधान कार्यालयाकडून दौऱ्याची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर मेट्रो सेवेच्या रीच तीनच्या मार्गाचे उदघाटन केले जाईल, असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Sep 2019 09:27 PM (IST)
नागपूरात शनिवारी पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यानचा 11 किलोमीटरच्या रिच 3 च्या टप्प्यातील प्रवासी सेवेचे उदघाटन करणार होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -