ठाकरे सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यात रोज कलगीतुरा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरही नारायण राणेंनी टीका केलीय. तोडपाणीसाठी नव्या सरकारकडून प्रकल्पांना स्थगिती देण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
तर, उद्धव ठाकरे मुख्यंमंत्री झालेच नसते
मुख्यमंत्री होण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्याचा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला. सोबतच बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, असेही ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाताना स्वतःच्या पक्षाची विचारधाराही त्यांना सांभाळता आली नसल्याची आठवणही राणेंनी ठाकरे यांनी करुन दिली.
राज्याला अनुभवी मुख्यमंत्री हवा -
राज्याला अनुभवी मुख्यमंत्र्याची गरज असल्याचे सांगत ज्याला राज्याचे खरे प्रश्न माहित आहे, ज्याच्यात ते प्रश्न सोडवण्याची धमक आहे, असा मुख्यमंत्री हवा. तरच राज्याची प्रगती होईल. अन्यथा महाराष्ट्राची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राणे म्हणाले. दरम्यान, नागपूरमधील विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवासापासून शेतकरी कर्जमाफी, सावरकर तसंच सामनाच्या मुद्द्यावरुन गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र, आजच्या कामकाजाची सुरुवात होण्यापूर्वी सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र आले. पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेले, ज्येष्ठ आमदार फोटोसेशनसाठी एकत्र जमले. परंतु या फोटोसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे काही काळ देवेंद्र फडणवीसांच्या गैरहजेरीबाबत चर्चा झाल्याचंही पाहायला मिळालं.
हेही वाचा - अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री : संजय राऊत
Narayan Rane Pc | बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते : नारायण राणे | ABP Majha