Nagpur Ganesh Idol Height Row : गणेशोत्सव महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदाचा गणेशोत्सव जरा खास असण्याची शक्यता असताना उपराजधानी नागपुरात गणेशोत्सवावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. नागपूर महापालिकेने यंदाही सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा तर घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फुटांपेक्षा जास्त नको असे निर्देश काढले आहेत. त्यामुळे गणेश मंडळांसह मूर्तीकारांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. तर भाजपनेही या प्रकरणात उडी घेत महापालिकेने उंचीच्या संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.


आगामी गणेशोत्सवात नागपुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चार फुटांहून अधिक उंचीची गणेश मूर्ती स्थापित करु नये, असा आदेश नागपूर महापालिका प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अनेक गणेश मंडळांनी आधीच देखावे निश्चित करुन त्याप्रमाणे चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीची ऑर्डर दिलेली आहे.


मंडळांकडून अनेक महिन्यापूर्वी ऑर्डर मिळाल्यामुळे मूर्तिकारांनीही मोठ्या आकाराच्या मूर्ती निर्माण करणे सुरु केले आहे. अनेक मूर्तीकार तर आता अखेरचा हात फिरवत आहे. अशात महानगरपालिकेच्या निर्णयाचा फटका मूर्तीकारांनाही बसण्याची शक्यता आहे.


गेले दोन वर्ष कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर अनेक बंधन आले. त्यामुळे यंदा कोरोनाचे संकट तेवढे तीव्र नसताना गणेशोत्सव मोकळेपणाने साजरा करायला मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या भाविकांच्या उत्साहावरही महापालिकेच्या निर्णयाने विरजण पडले आहे.


या मुद्द्यावर तीव्र सामाजिक भावना लक्षात घेऊन भाजपनेही या विषयात उडी घेतली असून महापालिकेने 24 तासाच्या आत मुघलशाही दर्शवणारा हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. राज्यातील इतर कुठल्याही महापालिकेत असा निर्णय झालेला नसताना नागपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर ही दडपशाही का असा प्रश्न भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.


सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मूर्तीकार तसेच भाविकांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर आता महापालिका गणेश मूर्तीच्या उंची संदर्भात काय निर्णय घेते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.