Nagpur : विदर्भवासीयांची पंढरी आणि प्रतिपंढरपूर म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्यात जत्रेची जोरदार तयारी झाली आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान हा यात्रा महोत्सव पार पडणार आहे. त्यात ठिकठिकाणचे लाखो भाविक सहभागी होतील, हे लक्षात ठेवून राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेची तयारी केली आहे. जिल्ह्यातील विविध आगारांतील 47 बसेस या तीन दिवसांत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांची धापेवाडा दर्शनाची सोय करणार आहे.
पंढरपूरची आषाढी एकादशीची महापूजा अन् यात्रा संपल्यानंतर साक्षात विठ्ठल धापेवाडा येथे आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी येतो, अशी आख्यायिकच नव्हे, तर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्याचमुळे धापेवाड्याला विदर्भाचे पंढरपूर म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या तिसऱ्या दिवशी धापेवाड्यात मोठी दर्शनजत्रा भरते. ती पुढे दोन दिवस चालते. जत्रेला विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे, तर विविध प्रांतातील भाविक गर्दी करताता. यंदा ही जत्रा 12 ते 14 जुलै दरम्यान भरणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ठिकठिकाणच्या भाविकांना धापेवाड्यात नेण्याची आणि आणण्याची व्यवस्था केली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील पाच आगारांतील एकूण 47 बसेस 12 ते 14 जुलै दरम्यान यात्रा स्पेशल म्हणून सज्ज करण्यात आल्या आहेत.
आगारनिहाय बस व्यवस्था
घाटरोड 15
काटोल 1
सावनेर 8
इमामवाडा 13
वर्धमाननगर 10
एकूण 47 बसेस
बसफेऱ्यांचे मार्ग
- घाटरोड आगारातून निघणाऱ्या बसेस नागपूर, कळमेश्वर मार्गे प्रवासी घेत धापेवाड्याला जातील.
- काटोलमधील बस काटोलसह मोहपा येथून धापेवाड्याला फेऱ्या मारेल
- सावनेर आगाराच्या बसेस सावनेर धापेवाडा अशा फेऱ्या करतील.
- इमामवाड्यातील बसेस, कळमेश्वर धापेवाडा फेऱ्या करतील
- वर्धमाननगर आगाराच्या बसेस नागपूर धापेवाडा मार्गावरील प्रवाशांना धापेवाडाची वारी घडवतील.
यात्रा स्पेशलसाठी एक निरीक्षक आणि चा4 नियंत्रक
एक वाहतूक निरीक्षक आणि चार वाहतूक नियंत्रक अशा पाच अधिकाऱ्यांवर यात्रा स्पेशल वाहतूक व्यवस्थेच्या नियोजन आणि नियंत्रणाची जबाबदारी राहणार आहे.