नागपूर : विधानसभेतील हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विधानसभेत प्रचंड गोंधळ होता. आजच्या गोंधळाचं कारण होतं, शिवसेनेचं मुखपत्र असलेलं 'सामना'. जेव्हा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामना वृत्तपत्राचा हवाला देत सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फडणवीसांना विरोध करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी याविषयवरून विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला.

विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, या सरकारमध्ये खूप मतभेत आहेत. आपलं म्हणणं विधानसभेत मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत सामना वृत्तपत्राची काही कात्रण घेऊन आले होते. ती वाचून दाखवत फडणवीस म्हणाले की, हे तेच वृत्तपत्र आहे, ज्यामध्ये कधीकाळी 'शरद पवारांना बकासुर पुरस्कार देण्यात यावा' असं म्हटंलं होतं. एवढचं नाहीतर याच वृत्तपत्रातून शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ : नागपूरच्या महापौरांवरील गोळीबारावरुन विधानसभेत गदारोळ



फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावर सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला आणि हा व्हिडीओ रेकॉर्डवरून हटवण्याची मागणी केली. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, विधानसभेच्या कामकाजात वृत्तपत्रात छापण्यात आलेल्या गोष्टींचा हवाला देणं चुकीचं आहे. तसेच शिवसेनेच्या आमदाराने फडणवीसांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत सांगितलं की, देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, ते सामना वाचत नाही, मग आज सामनाचा हवाला कसा देतायत?. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी आता सामना वाचायला सुरुवात केली आहे आणि जर तुम्हाला माझ्या सामना वाचण्यावर आक्षेप असेल, तर संजय राऊत तुम्हाला मंत्रीपद देणार नाहीत. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्या मनात शरद पवारांबद्दल प्रचंड आदर आहे, पण मी जे सांगतोय ते सामनामध्ये छापण्यात आलं होतं. यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितलं की, एखादी व्यक्ती सदनात उपस्थितच नाही आणि आपली बाजूही मांडू शकत नाही, त्या व्यक्तीवर टीका केली जाऊ शकत नाही.

पाहा व्हिडीओ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन विधानसभेत गदारोळ



दरम्यान, जेव्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार होतं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी सामनामधून विरोधी पक्षांवर टीका केली होती. परंतु, सत्तापालट झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखांतून भाजपवर तोफ डागली जाते. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच सदनात गोंधल सुरु असतो. पहिला दिवस सावरकरांच्या मुद्यावर गाजला तर, दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपापसांत भिडले होते.

संबंधित बातम्या : 

नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, हल्ल्यात महापौर थोडक्यात बचावले

शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणारच, विरोधकांनी उगाचच ओरडू नये : मुख्यमंत्री

विधानसभेत शिवसेना-भाजप आमदार भिडले, संजय गायकवाड-अभिमन्यू पवार यांच्यात धक्काबुक्की