रामटेक लोकसभा मतदार क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वाडी परिसरात नव्या मतदारांना नुकतंच निवडणूक आयोगाने तयार केलेले रंगीत मतदान कार्ड मिळाले. नियमाप्रमाणे हे नवीन मतदान कार्ड बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच बीएलओ (BLO)यांनी मतदारांच्या घरी जाऊन देणे अपेक्षित होते. मात्र शेकडो मतदारांच्या घरी हे नवीन मतदान कार्ड शिवसेनेचे पदाधिकारी घेऊन पोहोचले.
मतदारांच्याऐवजी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात हे मतदान कार्ड गेल्यामुळे मतदार ही गोंधळात पडले. या हलगर्जीपणाबद्दल काहींनी आक्षेप घेतले, तेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आले.
त्यानंतर या प्रकाराबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना विचारणा केली. जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकाराबद्दल चौकशी सुरु केली आहे. जर चौकशीत निवडणूक यंत्रणेशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.