नागपूर : मुख्यमंत्र्याच्या नागपुरात गुंडागर्दी थांबण्याचे नाव घेत नाहीये. दिवसागणिक नवनवे गुन्हे घडत असताना पोलिसांना मात्र यावर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयश येत आहे.  काल पहाटे नवीन घटना नागपूरच्या धंतोली परिसरातील महापालिकेच्या आपली बस सेवेच्या डेपोमध्ये  काही अज्ञात गुंडांनी 20 सिटी बसेसच्या काचा फोडल्या. तसेच डेपो मधील इतर साहित्याची देखील प्रचंड नासधूस केली.

17 मार्च रोजी डेपोमधील एका बसचा इलेक्ट्रिक खांबाला धक्का बसल्याने विजेच्या तारा तुटुन खाली पडल्या होत्या. त्यामुळे इलेक्ट्रिक खांबाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका खाजगी कारला आग लागून त्याचे नुकसान झाले होते. तेव्हा शेजारच्या वस्तीमधील काही लोकांचे डेपोच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाले होते.

त्याच वादातून काल पहाटे 8 ते 10 अज्ञात लोकांनी डेपोवर हल्ला केला आणि एकानंतर एक अशा 20 बसेसच्या काचा फोडत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. विशेष म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा परिसरातील वीज नसल्यामुळे अंधाराचा फायदा उचलून सर्व आरोपी पळून गेले.

या हल्ल्यानंतर डेपोचे कर्मचारी प्रचंड दहशतीत असून अजून एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून पोलिसांनी बस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे अशी मागणी डेपो मॅनेजर नीलमणी गुप्ता यांनी केली आहे.