Nana Patole : केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाबद्दल येत्या 13 मार्चला मुंबईत (Mumbai) राजभवनासमोर काँग्रेसच्या (Congress) वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. घोटाळेबाजांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, जे भाजपमध्ये (BJP) जातात ते स्वच्छ कसे होतात? असा सवालही नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. ईडीच्या (ED) कारवाया या पूर्वनियोजित असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
विरोधकांना घाबरवण्यासाठी कारवाया
कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं कारवाई सुरु केली आहे. त्यानंतर नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जमिनीवर भाजपचा बेस संपला आहे. त्यामुळं म्हणून ते विरोधकांना घाबरवण्यासाठी अशा कारवाया करत आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांचं उदाहरण आपल्यासमोर असल्याचे नाना पटोले म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा आरोप केला. मात्र, त्यातून काहीच मिळाले नसल्याचे पटोले म्हणाले. परमवीर सिंहाची चौकशीच केलीच नाही. निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात ठेवल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले.
ईडीच्या कारवाया पूर्वनियोजित, नाना पटोलेंचा आरोप
दरम्यान, कालच उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत ईडीच्या कारवाया संदर्भातले कागद किरीट सोमय्याकडे कसं पोहोचतात? ईडीची कारवाई कुठे होणार हे कोणालाच माहीत नसताना किरीट सोमय्याला कसं माहीत होते? असे प्रश्न विचारल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. त्यामुळं ईडीच्या कारवाया पूर्वनियोजित असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. जे जे भ्रष्ट नेते भाजपमध्ये जातात ते तिथे स्वच्छ होतात. भाजपमध्ये सर्व दूधाने धुतलेले आहेत का? असा सवालही पटोलेंनी उपस्थित केला.
ज्यांच्याकडे स्कूटर नव्हती त्या भाजपच्या नेत्यांकडे आज हेलिकॉप्टर
भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत की, ज्यांच्याकडे स्कूटर देखील नव्हती. आज त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. भाजप नेत्यांनी मोठे बंगले बांधले आहेत. यांच्याकडचे पैसे कुठून आले. याची चौकशी करणार नाही का? असा प्रश्नही नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. घोटाळेबाजारांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र घोटाळेबाज तुमच्याकडे आल्यावर स्वच्छ कसे काय होतात? याचे उत्तर कोण देईल असा प्रश्नही पटोलेंनी उपस्थित केला. भाजपचा जमिनीवर बेस संपला असल्याचे नाना पटोले म्हणाले. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी अशा कारवाया केल्या जात असल्याची टीका नाना पटोलेंनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या: