Nagpur Tekdi Flyover Bridge Demolition : नागपूरच्या (Nagpur) प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर समोरचा टेकडी उड्डाणपूल (Tekdi Flyover Bridge) पाडण्याचं काम उद्या म्हणजेच बुधवारपासून (19 जुलै) सुरु केलं जाणार आहे. मानस चौकाच्या दिशेने उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरु केले जाणार असून पुढील पंधरा दिवसात संपूर्ण उड्डाणपूल पाडण्याचे लक्ष्य आहे. 


सुरुवातीला उड्डाणपूल पाडण्याचं काम सोमवारीच (17 जुलै) सुरु होणार होते. परंतु नागपूर महापालिकेकडून (Nagpur Municipal Corporation) अधिकृत पत्र न मिळाल्याने उड्डाणपूल  पाडण्याचे काम लांबल्याचं मेट्रो प्राधिकरणाने सांगितलं.


म्हणून उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय


2008 मध्ये 16 कोटी 23 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल दहा मीटर रुंद आहे. मात्र, रेल्वे स्टेशनच्या समोरील भागात वाढलेली वाहतूक पाहता सध्या हा उड्डाणपूल अपुरा आणि गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकासमोरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि परिसरातील इतर विकासकामे लक्षात घेऊन महापालिकेने हा उड्डाणपूल पाडण्याचे ठरवलं आहे. 


दरम्यान जुन्या उड्डाणपुलाखाली यापूर्वी अनेक दुकानं होती. त्या दुकानांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. त्यासाठी महा मेट्रोने 111 दुकाने बांधली असून त्यामध्ये व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आलं आहे. पुलाखाली असलेल्या दुकानांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेकडे होती. गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेचे वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते. अखेर त्याला यश आलं आहे.


उड्डाणपूल पाडून सहा पदरी रस्ता होणार


उड्डाणपूल पाडण्याचे काम कोणत्याही त्रुटी शिवाय व्हावे, या उद्देशाने ती जबाबदारी महामेट्रोकडे सोपवण्यात आली आहे. भविष्यात या ठिकाणी मोठा आणि प्रशस्त उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. उड्डाणपूल पाडून हा रस्ता सहा पदरी होणार आहे. तसंच रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांसाठी पार्किंगची सोय आणि 200 दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स इथे बनणार आहे.


पाडकामादरम्यान अशी असेल वाहतूक व्यवस्था



  • उड्डाण पुलावरुन जयस्तंभ चौक आणि मानस चौकाकडे जाण्यास बंदी असेल

  • सेंट्रल एवेन्यूकडून एलआयसी किंवा आरबीआय चौकाकडे जाणारी वाहतूक आणि त्या उलट वाहतूक पूर्वीप्रमाणे कार्यरत राहिल.

  • एलआयसी किंवा आरबीआय चौकाकडून सेंट्रल एवेन्यू किंवा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहतुकीमध्येही कुठलाही बदल नसेल

  • सेंट्रल एवेन्यू येथून प्रवास करणाऱ्या आणि रेल्वे स्थानकाकडे जायचं आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच डावीकडे वळण घेऊन त्यांच्या स्थानी पोहोचावे लागेल


हेही वाचा


Nagpur News: आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊनही पालकांकडून मागितले प्रवेश शुल्क, शिक्षण विभागाची शाळेवर कारवाई