Nagpur : नागपूर पदवीधर मतदार संघाचा धक्कदायक निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकडे. गेल्या वेळेस विजय मिळवणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक परिषदेने यावेळेस विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र दोन प्रमुख पक्ष असलेले भाजप व काँग्रेसने अजून तरी आपले पत्ते उघडले नाही. मात्र भाजप ने नागो गाणार यांना समर्थन देण्याचे संकेत दिले आहे.


नागपूर महानगर पालिकेच्या शिक्षक संघाच्या संमेलनात  शिक्षक मतदार संघातील महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आपला उमेदवार घोषित केला नसला तरी नागो गाणार यांना भाजपकडून समर्थन दिले जाईल, असे संकेत मिळत आहे. यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यांनी संकेत दिले असून लवकरच याबाबत भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यानिशी सांगितलं आहे. 


दुसरीकडे काँग्रेसने अजून तरी आपले पत्ते उघडले नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार हा सहाव्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यामुळे गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडे यांना समर्थन द्यावे, असा एक सूर काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. त्याला एक कारण ही तसेच आहे, विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांना समर्थन दिले होते. त्यामुळे यावेळेस शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे समर्थन मिळावे यासाठी शिक्षक भारती पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अजून तरी सावध पवित्रा घेताना दिसत  आहे. 


नागपूर परिषद शिक्षक मतदार संघ



  • नागपूर शिक्षक मतदार संघात नागपूर ,भंडारा ,गोंदिया ,चंद्रपूर , गडचिरोली ,वर्धा हे सहा जिल्हे येतात. 

  • या मतदार संघात 39 हजार 477 मतदार आहेत.

  • या पैकी नागपूर मध्ये 16 हजार 325 मतदार आहे, चंद्रपूरमध्ये 7 हजार 471, वर्धामध्ये 4 हजार 862, गोंदियामध्ये 3 हजार 881, भंडारामध्ये 3 हजार 730 आणि गडचिरोलीत 3 हजार 208 मतदार आहे. 

  • विजयी उमेदवाराला जिंकण्यासाठी एकूण झालेल्या मतदाराच्या (50% + 1) कोटा पूर्ण करावे लागेल.


दरम्यान, 30 जानेवारीला ही निवडणूक असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी आहे. त्यामुळे भाजपची भूमिका जवळपास स्पष्ट झाली असली तरी काँग्रेस काय भूमिका घेते, यावर नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे.