Nagpur News : विविध कारणांमुळे सतत चर्चेत असणारे नागपुरातील मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सकाळी पेशीवरुन परत आल्यावर मुख्य दारावर अंगझडती दरम्यान एका कैद्याकडे मोबाईल फोन आणि तीन बॅटरी सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. यापूर्वीही नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात मोबाईल फोन, बॅटरी आणि गांजा आदींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची आणि यामध्ये पोलीस शिपायांचा सहभाग असल्याची बाब उघडकीस आली होती. यानंतर पुन्हा ही घटना घडली आहे.


प्राप्त माहितीनुसार मुळच्या नाशिकच्या असलेल्या कैद्याला गुजरातला पेशीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला नागपूरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांनी कैद्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे मोबाईल फोन आणि त्याच्या तीन बॅटरी आढळून आल्या. मात्र कैद्याला पेशीसाठी घेऊन गेलेले आणि परत आणणाऱ्या पोलिसांना याबद्दल कशी माहिती मिळाली नाही याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे.


पहिल्या धाडीत पोलिसांचे हात रिकामे...


यापूर्वी नागपूरच्या पोलीस (Nagpur Police) आयुक्तांनी फौजफाट्यासह नागपूर मध्यवर्ती कारागृहात टाकलेल्या पहिल्या धाडीत काहीच ठोस आढळून आले नव्हते. मात्र पुन्हा एकदा कारागृहात टाकलेल्या छाप्यात पोलीस शिपायांच्या मदतीने कुख्यात गुन्हेगारांना सर्रास गांजा, मोबाईल फोन, बॅटरी पुरवले जात असल्याचे रॅकेट उघडकीस आलं होते. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुख्यात श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड यांचा समावेश आहे. श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर या तिघांवरही मोक्का आणि एमबीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांनंतर ते बाहेर आले होते. त्यापूर्वी कारागृहात त्यांची निषेद वासनिक आणि वैभव तांडेकर यांची ओळख झाली. निषेद वासनिकने आठ महिन्यांपूर्वी क्रिप्टो करन्सीच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी त्याला लोणावळ्यातून अटक केली होती.


अधिकाऱ्यांवरही 'वॉच'


आतापर्यंत अनेकवेळा कारागृहातील तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात पोलीस शिपायांचा सहभाग असल्याची बाबही उघडकीस आली होती. यानंतरही वरिष्ठांकडून या शिपायांवर ठोस कारवाई करण्यात येत नाही. अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हे सर्व घडवून आणण्यात येत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यामुळे या प्रकरणात कारागृहातील काही अधिकारीही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.


ही बातमी देखील वाचा...


Nagpur News : सहकारी महिला कर्मचाऱ्यांकडे टक लावून बघितल्यास निलंबन, नागपूर मनपाच्या सर्वच विभागात फलक