नागपूर: जिल्ह्यातला सर्वात मोठा गुंड आणि नागपुरातील इतर अनेक गुन्हेगारांचा आश्रयदाता अशी ख्याती असलेल्या रणजित सफेलकरचा 'राजमहाल' नावाचा मोठा सेलिब्रेशन हॉल पोलिसांनी पाडण्यास सुरुवात केली आहे. नागपूर कामठी रोडवर राजमहल नावाचा सेलिब्रेशन हॉल रणजीत सफेलकर आणि त्याच्या दोन पार्टनर्सकडून गेली अनेक वर्षे चालवला जात होता. लग्न समारंभ आणि इतर समारंभांसाठी लाखो रुपये मोजून हा सेलिब्रेशन हॉल भाड्यावर दिला जात होता. आता त्या इमारतीवर पोलिसांनी हातोडा चालवायला सुरुवात केली आहे.
रणजित सफेलकरच्या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरू होताच, त्या तपासामध्ये समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. रणजित सफेलकरने राजमहाल नावाचा हा सेलिब्रेशन हॉल सरकारी जमिनीवर बनवलेला होता. त्यासाठी फक्त सरकारी जमीनच बळकावली नव्हती तर त्या ठिकाणातून वाहणारा पाटबंधारे विभागाचा कालवा रणजीत सफेलकर आणि त्यांच्या गुंडांनी बुजवून टाकला होता आणि कालवा बुजवून त्याच्यावर लाखो रुपयांचा उत्पन्न देणारा राजमहाल उभारला होता.
नागपूरचे वयोवृद्ध आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्या प्रकरणात रणजीत सफेलकरचा नाव समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रणजीत सफेलकरने त्यांच्या शिवाय इतर अनेकांच्या हत्या घडवल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात रणजीत सफेलकरच्या गुन्ह्यांची कुंडली जशी समोर येऊ लागली तशी धक्कादायक माहितीही समोर येऊ लागली.
पोलिसांनी त्याच्या संपत्तीचा शोध सुरू केला. लाखो रुपये रोज उत्पन्न मिळवून देणारा हा राजमहाल सरकारी जमीन बळकावून उभारला आहे हे समोर येताच पोलिसांनी सर्व परवानग्या घेऊन तो राजमहल आजपासून पाडण्यास सुरुवात केली आहे. राजमहल नावाचा हा सेलिब्रेशन हॉल प्रचंड मोठा असून तो पाहण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. याच्या आधीही नागपूर पोलिसांनी संतोष आंबेकर आणि साहिल सय्यद नावाच्या गुंडांच्या इमारती पाडून नागपुरात गुंडांच्या बळकावलेला संपत्ती जमीनदोस्त करण्याचा नवा नागपूर पॅटर्न सुरू केला आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की पाटबंधारे विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली असून राजमहाल उभारताना पाटबंधारे विभागाची किती जमीन बळकावण्यात आली होती ही माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे.
सोबतच रणजीत सफेलकरची नागपूर शहरासह जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आहे त्याची ही माहिती गोळा केली जात असून त्यापैकी सर्व बेकायदेशीर संपत्तीवर लवकरच पोलिसांकडून हातोडा चालवला जाईल अशी माहितीही उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली आहे.
पहा व्हिडीओ: Nagpur : नागपूर पोलिसांकडून गुंड रणजीत सफेलकरचा 'राजमहाल' उध्वस्त
महत्वाच्या बातम्या :