नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील महादूला परिसरात पतंग पकडताना कालव्यात एक मुलगा वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली. दोघे भाऊ खेळत असताना पतंग पकडायला गेल्याने दोघेही पाण्यात पडले होते. त्यानंतर मोठ्या भावाला स्वत:ला वाचवण्यात यश आले. आठ वर्षीय लहान भाऊ दयाशंकर अवधेश प्रजापती हा दुर्दैवाने वाहून गेला. ही घटना बुधवार 17 जानेवारीला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेला 48 तास उलटून गेले तरी वाहून गेलेल्या दयाशंकरचा शोध आतापर्यंत लागला नाही. 


पतंगीचा पाठलाग करताना गेला कालव्यात तोल 


नागपूर जिल्ह्यातील महादूला परिसरात असलेल्या कालव्याजवळ दयाशंकर आणि त्याचा मोठा भाऊ कैलाश (12) हे दोघेही खेळत होते. दरम्यान अचानक कटलेली पतंग पकडायला ते गेले. मात्र या पतंगीचा पाठलाग करताना हे दोघेही जवळच्या कालव्याच्या पाण्यात पडले. त्यानंतर कैलाश या मोठ्या भावाने कसेबसे स्वतःला वाचविले, मात्र यात लहान भाऊ दयाशंकर पाण्यात वाहून गेला. त्यानंतर मोठ्या भावाने आरडा-ओरड करून घडलेल्या प्रकारची माहिती इतरांना दिली.


त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत लहान भावाचा बराच वेळ शोध घेतला. मात्र त्यात यश आले नाही. बुधवारी दुपारपासून पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दयाशंकरचा शोध घेण्यात येत आहे. तो आतापर्यंत सापडलेला नाही.


चंद्रपुरात 'पतंग'बाजी बेतली जीवावर


चंद्रपुरात 'पतंग'बाजी जीवावर बेतली आहे. पतंग पकडताना स्लॅबवरून खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आनंद वासाडे (49)  असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी स्लॅबवरून तोल गेल्याने आनंद यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भानापेठ परिसरात राहणारे आनंद वासाडे हे घराच्या स्लॅबवर गेले होते. याचवेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ही पतंग पकडण्यासाठी आनंद वासाडे गेले, मात्र, स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करताना आकाशात रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद आहे. मात्र, आकाशातील पतंग पाहताना जमिनीवरील परिस्थितीचे भान राखणे तेवढेच महत्त्वाचे आहे. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो आणि प्रसंगी स्वतःचा जीव गमावतो किंवा इतरांचे बळी घेतो. उत्सव साजरा करणे चांगले, पण त्यात एखाद्याला जीव गमवावा लागत असेल तर असा उन्माद कशासाठी, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: