नागपूर : महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात भटक्या आणि विमुक्त जमातीचे समूह आपल्याला दिसतात. गावाच्या वेशीवर, मोकळ्या रानात राहूट्या बांधून जगणारा हा समाज शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या विविध योजनांपासून कोसो लांब आहे आणि अशाच कोट्यवधी लोकांसाठी महाराष्ट्राचा एक तरुण आपलं जीवन खर्ची घालत आहे. संजय कदम असं त्याचं नाव असून तो पुण्यातील दौंडचा आहे. सध्या भटक्या विमुक्त जमातीतील बांधवांसाठी संपूर्ण देशाच्या भटकंतीवर निघाला आहे. जाणून घेऊया "भटक्यांसाठी भटकणाऱ्या" या ध्येयवेड्या तरुणाबद्दल...
भटक्या विमुक्त समाजामध्ये जन्म घेऊन उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुखाची नोकरी न पत्करता आपल्या समाज बांधवांसाठी आयुष्य खर्ची घालणारा ध्येयवेडा तरुण संजय कदम सध्या भारत यात्रेवर आहे. मूळचा पुणे जिल्ह्यातील दौंडचा संजय कदम 7 ऑक्टोबर 2017 रोजी घराबाहेर पडला. स्वतः रस्त्यावर जन्मलेल्या संजयने आपल्या समाज बांधवाच्या अपेष्टांचं मूळ त्यांच्या अज्ञानात आहे, हे हेरले आणि त्यांच्यात जागृती घडवण्याच्या उद्देशाने भारत यात्रा सुरु केली. विशेष म्हणजे संजय कदम स्वतःची ओळख ही संजय भारतीय अशीच करुन देतो. प्रत्येक जण मी अमूक जातीचा तमूक धर्माचा असेच सांगतो. मात्र, भारतीय असल्याचं कोणीच सांगत नाही. त्यामुळे "एक तीर एक कमान सब भारतीय एक समान" अशी स्वतःची ओळख संजय करुन देतो. 'भटका' हा शब्दच मूळात हीन आणि वेगळेपणाची जाणीव करुन देणारा असल्याने भटकंती करणारा समाज एका ठिकाणी स्थिर व्हावा म्हणून 'घुमन्तु घुमक्कड, अर्धघुमन्तू जाती जमाती जोडो' अभियानाला संजयने सुरुवात केली आहे.
काय आहे संजय कदम यांचं 'घुमन्तु घुमक्कड, अर्धघुमन्तू जाती जमाती जोडो अभियान'?
आपल्या या मोहिमेत संजयने बाईकवर 20 राज्यांचा दौरा पूर्ण केला असून 88 हजार हजार किलोमीटरची यात्रा करत भटक्या विमुक्त जमातीतील लाखो लोकांना भेटून त्यांचे घटनात्मक हक्क, कायदेशीर अधिकार आणि कर्तव्यांबद्दल जागृत केलेच आहे. शिवाय विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचे लाभ पदरात कसे घ्यायचे त्याबद्दल ही संजय त्यांना जागृत करतो. त्यासाठी संजय ज्या भागात, गावापासून दूर वस्त्या-वाड्यावर पाल टाकून, आकाशाला छत समजून राहूटीत राहणाऱ्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधतो. देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष लोटूनही भटका विमुक्त समाज शिक्षणापासून दूर राहिला. उलट अशिक्षितपणा, मागासलेपणा, व्यसनाधीनता आणि यातून गुन्हेगार अशी छाप समाजातील तरुणांवर पडली. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी ही जनजागृती करण्याचे काम संजय कदम करतो.
भटक्या समाजाचा डेटा देऊन स्वतंत्र अनुसूचीची मागणी
याच जनजागृती मोहिमेत संजय कदम याने आजवर 88 हजार किलोमीटर प्रवास केला असून दिवस रात्र भटकंती करत मिळेल त्या पालावर राहणे, आणि भटक्या समाजातील समाज बांधवांसोबत त्यांच्या भाषेत संवाद करत आपल्या यात्रेचा उद्देश समजावून सांगणे असाच संजयचा दिनक्रम असतो. आपल्या अभियानात भटक्या समाजातील दोन कोटी लोकांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं संजयचं उद्दिष्ट आहे. या भेटीतून संजय फक्त संवादच करत नाही तर भटक्या समाजाचा डेटा गोळा करुन तो डिसेंबर महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सामाजिक न्याय विभाग आणि घुमन्तु घुमक्कड अर्धघुमन्तू वेल्फेअर बोर्डचे अध्यक्ष यांना सोपवणार आहे. या भटक्या विमुक्त समाजासाठी डी एनटी कॅटेगरी निर्माण करुन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर पावले उचलण्यात यावे अशी मागणी संजय कदमची आहे. केंद्रातही भटक्या समाजासाठी स्वतंत्र अनुसूची (कॅटेगिरी) करुनच त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, अशीही मागणी संजय कदम यांची आहे.
शिक्षण हेच सर्व समस्यांचे उपाय
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाशी, व्यसनाधीन तरुणांना योग्य मार्गाची जोडण्याचे कामही संजय आपल्या अभियानाच्या माध्यमातून करत आहे. गेल्या साडे पाच वर्षात संजय कदम यांनी देशभरात हजारो व्यसनाधीन तरुणांना आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवले आहे. भारत यात्रेत सध्या संजय नागपुरात पोहोचला असून पुढे दक्षिण भारतात जाणार आहे.