नागपूर : महाजनको आणि महाराष्ट्र खनिकर्म मंडळाचे अधिकारी आणि कोळसा धुणाऱ्या कोल वॉशरीज कंपनीच्या संगनमताने सुमारे 1 लाख 20 हजार टन कोळसा खुल्या बाजारात विकल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केला. यामुळे दोन महिन्यात तब्बल 180 कोटींचा आर्थिक फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरात राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रशांत पवार बोलत होते. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत रिजेक्ट कोल हा खुल्या बाजारात विकावा अशी मागणी त्यांनी केली आहे.


डब्लूसीएलकडून मिळणारा कोळसा कोल वॉशरीज कंपनी महाजनकोला धुवून देतात. यानंतर या कोळशापासून वीज निमिर्ती होते. पण हा कोळसा धुवून वीज निर्मितीला कोणताही फायदा होत नसल्याचे आरोप माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केला. त्यामुळे याचा फायदा होत नसेल तर या धुतलेल्या कोळशाचा उपयोग काय, असाही सवाल प्रशांत पवार यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे.


काँग्रेसच्या काळात कोल वॉशरीज 2007 मध्ये बंद केली, मग पुन्हा सुरु का?
कोल वॉशरीज कंपनीच्या माध्यमातून महानिर्मितीचे अधिकारी हेराफेरी करत असल्याचा आरोप 2007 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात झाला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करुन कोल वॉशरीजचा गोरखधंदा बंद केला. पण 2019 मध्ये भाजपचे सरकार असताना तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इम्पोर्टेड कोळसा महाग असल्याने चांगल्या दर्जाचा उष्मांक असलेल्या कोळशासाठी तो धुवून वापरावा, असे आदेश काढले. त्यामुळे 2007 मध्ये बंद झालेला कोल वॉशरीज कंपनी पुन्हा का सुरु करण्यात आली असा सवाल प्रशांत पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बंद झालेला गोरखधंदा कोळसा रिजेक्ट कोळसा म्हणून पुन्हा सुरु झाला.



खुल्या बाजारात विकला कोळसा?
2022 मध्ये माहिती अधिकारातील माहितीनुसार यात फेब्रुवारी 2022 मध्ये 65 हजार 284 टन साठा आणि मार्च 2022 मध्ये 54 हजार 554 टन कोळशाच्या साठ्यात घट दाखवण्यात आली. त्यानुसार या दोन्ही महिन्यातील या कोळशाच्या एकूण साठ्यात सुमारे 1 लाख 20 हजार टन घट झाली आहे. त्यामुळे हा कोळसा कुठे गेला असा सवाल उपस्थित करत हा कोळशाची विल्हेवाट कुठे लावली हे माहिती अधिकारात स्पष्ट होत नाही. त्यामुळे यात भ्रष्टाचार करत हा कोळसा खुल्या बाजारात विकला तर गेला नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


दोन महिन्यात 180 कोटींचा कोळसा खुल्या बाजारात विकला?
रिजेक्ट कोळसा खुल्या बाजारात विकल्यावरच किंवा दुसऱ्या पॉवर प्लांटला विकल्यावर कमी होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोल वॉशरीजने कमी केलेला हा कोळसा ज्याची किंमत खुल्या बाजारात प्रतिटन 15 हजार इतकी आहे. याची गोळाबेरीज केल्यास 1 लाख 20 हजार टन कोळशाची किंमत 180 कोटी आहे. पण ही बाब महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ आणि माहजनकोच्या अधिकाऱ्यांना माहित असतानाही कुठली कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला. या कोळसा विकण्याचे षडयंत्र महाजनकोचे अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच सुरु तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.


राज्य सरकारने चौकशी करण्याची गरज
यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. यामध्ये महाजनकोच्या वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली. याबरोबरच जो कोळसा रिजेक्ट कोलच्या नावाने कोल वॉशरीज परत करतात. त्याची विक्री स्वतः महाजनकोने खुल्या बाजारात केली तर हजारो कोटीचा नफा हा होऊ शकते. त्यामुळे या कोल वॉशरीजची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केली.