Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या मुंबईतील (Mumbai) तरुणाविरोधात नागपुरातील (Nagpur) लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 354, 500, 504, 505, 507 आणि आयटी ॲक्टच्या कलम 67 अन्वये  या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कपाडी असं या तरुणाचं नाव आहे. तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.


हे ट्वीट 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहेत. सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते अतुल भातकळकर, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे या सर्वांच्या विरोधात एकानंतर एक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. नागपुरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी ते ट्वीट पाहिले आणि त्यानंतर रात्री उशिरा लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांनी सार्थक कपाडीला अटक करण्याची तयारी केली आहे.  अतिशय अर्वाच्च आणि आक्षेपार्ह भाषेत हे ट्वीट करण्यात आले होते. सार्थक कपाडी ट्विटर हॅण्डल स्वत: वापरतो की त्याच्या नावाने फेक ट्विटर हॅण्डल तयार करण्यात आलं आहे की हे अकाऊंटच फेक आहे, याचा सायबर पोलिसांकडून तपास सुरु आहे.  


कसा समोर आला प्रकार?


सुरुवातीला भाजपला या ट्वीटबद्दल कल्पनाच नव्हती. सार्थक कपाडी याचं ट्विटर हॅण्डल फॉलो करणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्याने हे ट्वीट पाहिले. त्यानंतर त्यांनी आमदार कृष्ण खोपडे यांना संबंधित ट्वीट पाठवले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.


या प्रकारामागे ठाकरे गट : कृष्णा खोपडे


या संपूर्ण प्रकारामागे ठाकरे गट असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. "खालच्या स्तरावर, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्याच आला आहे. हा व्यक्ती कोण आहे याची चौकशी केली असता तर सार्थक कपाडी हा मुंबईचा असल्याचं कळलं. त्याची उद्धव ठाकरेंसोबत उठबस असते आणि तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी याची चौकशी करावी," असं आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटलं.


VIDEO : Nagpur : शिंदे-फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या तरुणाविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा