नागपूर : दोन हजारांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर नक्षलवाद्यांची (Naxal) मोठी कोंडी झाली आहे.  त्यामुळे आता नक्षली 20 टक्के कमिशनचं आमिश दाखवून लाखो रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा बदलवून घेत असल्याचं समोर आले आहे. गडचिरोलीतील अहेरीत पोलिसांनी नक्षलींच्या दोन समर्थकांना 27 लाख 62 हजार रुपयांच्या रकमेसह अटक केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींचे नाव रोहित कोरसा आणि विप्लव सिकंदर असून एका आरोपीचे जुने नक्षलकनेक्शन समोर आले आहे. नक्षलग्रस्त भागात दोन हजारांच्या नोटा जप्त केल्याची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बँकात जाऊन बदलून घेण्याची मुदत दिली आहे. सामान्य नागरिक सुरळीतपणे या प्रक्रियेतून आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलूनही घेत आहेत. मात्र रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे नक्षलवाद्यांची मोठी कोंडी झाली आहे. खंडणीच्या स्वरूपात नक्षलग्रस्त भागातील मोठे व्यापारी कंत्राटदार आणि इतरांकडून वसूल केलेली नक्षलवाद्यांची कोट्यवधींची रक्कम दोन हजाराच्या नोटांच्या स्वरूपात आहे.ही कोट्यवधींची रक्कम टप्प्याटप्प्यांमध्ये बदलून घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी 20 टक्के कमिशन देणे सुरू केले आहे.


काल गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी अहेरीजवळ दोन जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून 27 लाख 62 हजार रुपये जप्त केले आहे. अटक केलेल्या आरोपींचे नाव रोहित कोरसा आणि विप्लव सिकंदर असून एका आरोपीचे जुने नक्षल कनेक्शन ही आहे. हे दोघे काल बाईक वरून मोठी रक्कम घेऊन जात असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली. तेव्हा त्यांच्या जवळ 27 लाख 62 रुपयांची रोकड सापडली. त्यामध्ये काही नोटा या दोन हजारांच्या  तर काही नोटा 500 च्या होत्या.


तपासात दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन हजार रुपयांची नोट मोठ्या प्रमाणावर बदलून घेतले होते. तर उर्वरित नोट त्यांना बदलून घ्यायच्या होत्या. या कामासाठी नक्षलवादी त्यांना 20 टक्क्यांचा घसघशीत कमिशन ही येत असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या मते दोन हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण नक्षलींनी खंडणीच्या स्वरूपात गोळा केलेली आणि जंगलात लपवून ठेवलेली कोट्यवधींची बहुतांशी रक्कम दोन हजारांच्या नोटांमध्ये आहे. आणि आता ती बदलून घेणे त्यांना अडचणीची ठरत आहे. यापूर्वी झालेल्या नोटाबंदीनेही नक्षलवादी, दहशतवादी इतर देश विघातक संघटनाना अडचणीत आणले होते असा पोलिसांचा अनुभव आहे.या संदर्भात पोलीस सातत्याने नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवून आहेत. भविष्यात आणखी भक्कम कारवाई गडचिरोली पोलीस करणार असल्याचं विश्वास गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे.