नागपूर : गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायद्याचा धाक कमी होत चालला आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ज्या दिवशी नागपूर पोलिसांचे तब्ब्ल अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची सुरक्षा करत होते. त्याच दिवशी काही टवाळखोर रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करत इतरांचे जीव धोक्यात घालत होते. नुकतंच उद्घाटन झालेल्या वांजरीनगर उड्डाणपुलाचा 26 जानेवारीच्या दुपारचा एक व्हिडियो व्हायरल झाला आणि काही धनदांडग्यांनी वंजारीनगर उड्डाणपुलावर त्या दिवशी दुपारी काय गोंधळ घातला हे सर्वांसमोर आले. विशेष म्हणजे ज्या उड्डाणपुलावर हे धुडघूस घातला त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 23 जानेवारीला केले होते.


तीव्र गतीने येणारी होंडा सिटी.... उड्डाणपुलाच्या मधोमध येऊन अचानक ब्रेक मारते... ड्रिफ्ट करते आणि उलट्या दिशेने फिरते. त्याच्या मागोमाग शेव्हर्ले क्रूज, क्रेटा आणि व्हर्ना कार ही तेवढ्याच गतीने येतात आणि ड्रिफ्ट घेणाऱ्या होंडा सिटीच्या आजूबाजूने उड्डाणपुलावर थांबतात. ही एखाद्या चित्रपटाचा थरारक दृश्य नाही तर उपराजधानीतलं एक उड्डाणपूलावरची घटना आहे. दक्षिण नागपूरला - पश्चिम नागपूरशी जोडणारा अजनी आणि वंजारीनगर दरम्यानचा उड्डाणपूल 23 जानेवारी रोजीच लोकांसाठी सुरु करण्यात आला आहे. अर्धा किमी लांबीच्या या उड्डाणपुलामुळे अजनी आणि वंजारीनगर दरम्यान रोज होणारी वाहतूक कोंडी तर सुटणारच आहे. शिवाय अजनी आणि वंजारीनगर मधील अंतर ही दीड किमीने कमी होणार आहे.


मात्र, सामान्य नागपूरकरांनी या उड्डाणपुलाचा लाभ घ्यावा त्याच्या आधीच काही टवाळखोरानी या उड्डाणपुलाला स्टंटबाजीचा ठिकाण बनवून टाकले. 26 जानेवारीचा धोकादायक व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या चारही कारचा आणि त्यांच्या मालकांचा शोध सुरु केला. तेव्हा अमन सिंह, अमीन अन्सारी, अनिकेत माहुले आणि सोहेल खान या तरूणांनी ही स्टंटबाजी केल्याचे समोर आले. पोलिसांनी चौघांच्या महागड्या कार जप्त केल्या असून त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.


दरम्यान, एबीपी माझाने जेव्हा वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात या कारचे निरीक्षण केले तर त्यामध्ये अनेक नियमबाह्य मॉडिफिकेशन आढळून आले. एक कार विना नंबर प्लेटची ही आढळली. सर्व कारमध्ये नियमबाहय गडद काळी फिल्म लावलेली होती. तर एका कारमध्ये सत्ताधारी शिवसेनेचा झेंडाही लावलेला आढळला. सामान्य नागपूरकरांनी मात्र पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. फक्त काहीशे रुपयांचा दंड धनदांडग्या स्टंटबाजाना पुरेसे नसून त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. तर अशा स्टंटबाजांमुळे रस्त्यावर चालणे कठीण होऊन पोलिसांनी मोहिम हातात घ्यावी ही मागणी काही नागपूरकरांनी केली आहे.


नागपूर असो किंवा पुणे, नाशिक, मुंबई राज्यातील सर्वच मोठ्या शहरात अशा स्टंटबाजांच्या धुडघुसामुळे अनेकांचे अपघात झाले आहे. चंद्रपुरात ही नुकताच एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जखमी झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी अशा स्टंटबाजांविरोधात कडक कारवाई करत त्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे.


संबंधित बातम्या :



चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर स्टंट बायकिंगचा उच्छाद! स्टंटच्या नादात निष्पाप तरुण जखमी


Ajni Vanjari Bridge Stunt | अजनी-वंजापी नगर उड्डाणपुलावर स्टंटबाजी