नागपूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनाच्या दिवशी नागपुरात गोंधळ, विरोध, नाराजी आणि सुरक्षेच्या नावावर पोलिसांकडून अभूतपूर्व बंदोबस्त लावल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाला होणाऱ्या विरोधाचे सूर दडपशाहीने दाबले जात आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे.


नागपूरच्या वेशीवर 1 हजार 941 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले गोरेवाडा प्राणी उद्यान आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे जाहीर केले आणि नागपुरात विरोधाचे स्वर उभे होऊ लागले. आदिवासी समाजाने गोरेवाडा परिसर ऐतिहासिक दृष्ट्या आदिवासी समाजाची वस्ती राहिली असून मागील सरकारने गोरेवाडा उद्यानाला गोंडवाना हे नाव देण्याचे तत्वतः मान्य केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा विरोध केला. आज विदर्भातील अनेक जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी विधानभवनसमोर आदिवासी राजे बख्त बुलंदशाह यांच्या प्रतिमेसमोर निषेध आंदोलन केले. सरकारने आमच्या भावनांचा आदर करावा, मागील सरकारने देऊ केलेला गोंडवाना हे नाव आमच्या अस्मितेचे प्रश्न आहे. जर सरकारने बळजबरीने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले तर भविष्यात राज्यभर आदिवासी समाजाचे आंदोलन सुरू करू, असा इशारा आदिवासी नेत्यांनी दिला आहे.


बाळासाहेब ठाकरे हे विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध करत होते, असा मुद्दा समोर करत विदर्भवाद्यांनी ही विदर्भातील प्रकल्पाला बाळासाहेबांच्या नावाला विरोध दर्शवला होता. कालच विदर्भवाद्यांनी मुखमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. मग काय पोलिसांनीही विमानतळापासून गोरेवाडा प्राणी संग्रहालय दरम्यानच्या सुमारे 17 किमीच्या मार्गाला किल्ले सदृश सुरक्षा व्यवस्था लावून विदर्भवादी आणि आदिवासी आंदोलकांची कोंडी केली. मार्गातील काही बाजार बंद करायला लावले गेले, दुकाने बंद करायला लावली गेली.


पोलिसांच्या सुरक्षेव्यवस्थेचा सर्वाधिक अतिरेक काटोल नाका चौकाजवळ झाला. जिथे विदर्भवादी आंदोलकांना थांबविण्यासाठी पोलिसांनी गोरेवाडा उद्यानाच्या 6 किमी आधीच नाकाबंदी करून आंदोलकासह सामान्य नागरिकांचीही कोंडी केली. त्यामुळे काटोल, कळमेश्वर जाणारे अनेक वाहन चालक एकतर अडकून पडले किंवा त्यांना लांबच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. दुपारी 2 च्या सुमारास काटोल नाका चौकाजवळ गोळा झालेल्या विदर्भवादी आंदोलकांनी नारेबाजी करत काळे झेंडे काढताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तर काहींना तर कळमेश्वर रोडवर शहराच्या बाहेर बरेच लांब नेऊन थांबवून ठेवण्यात आले.


दरम्यान, या सर्व गोंधळापासून लांब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणी उद्यानात इंडियन सफारीचा उदघाटन करत प्राणी निरक्षण केले. त्यांच्यासोबत वनमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत हे उपस्थित होते. दरम्यान ज्या तऱ्हेने आज बाळासाहेबांच्या नावाने प्राणी उद्यानाचे उदघाटन झाले आणि पोलिसांच्या दडपशाही नंतरही विरोध झाले, ते पाहता हा वाद लवकर थंड होणार नाही हे निश्चित.