Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज नागपुरातील (Nagpur) राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr K B Hedgewar) यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. मुख्यमंत्री सकाळी साडेदहाच्या सुमारास रेशीमबाग (Reshimbag) इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे दाखल झाले आणि त्यांना आदरांजली वाहिली. तसंच आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोलवलकर यांच्या स्मृतिंनाही एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) हे देखील उपस्थित होते. कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री आरएसएसच्या कार्यालयात येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. 


दोन दिवसांपूर्वी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवनात


याआधी 27 डिसेंबर रोजी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवन परिसरात आले होते. त्या दिवशी भाजप आमदारांसोबत शिंदे गटाचे आमदार ही येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्या दिवशी फक्त भाजप आमदार संघ कार्यालयात आले होते. त्या दिवशीचे उपक्रम फक्त भाजप आमदारांसाठी होता असे भाजपने स्पष्ट केले होते. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रेशीमबागला आले आणि डॉ. हेडगेवार यांच्यासमोर नतमस्तक झाले.


हे एक प्रेरणास्थान, राजकीय हेतूने आलो नाही : एकनाथ शिंदे 


आदरांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे एक प्रेरणास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. बालपणी संघाच्या शाखेत गेलो होतो. इथे आल्यावर समाधान आहे. यात कोणताही राजकीय हेतू नाही. मुख्यमंत्री बनल्यानंतर मला इथे आल्यानंतर नवा अनुभव मिळाला आहे. शिवसेना-भाजप सोबत आहोत."


एवढ्या लवकर रक्तांतर होईल वाटलं नव्हतं : संजय राऊत


संघ विचारांचा रेशमी कीडा त्यांच्या कानात आणि मनात वळवळत आहे. रेशीमबागेत जाणं काही चुकींच नाही. काही दिवसांनी मुख्यमंत्री सभागृहात खाकी पॅन्ट आणि काळी टोपी घालून येतील. आरएसएसवर आम्ही कधी टीका केलेली नाही. पक्षांतरानंतर एवढ्या लवकर रक्तांतर होईल असं वाटलं नव्हतं, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या रेशीमबाग भेटीवरुन टीका केली. 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दीक्षाभूमीला भेट


दरम्यान रेशीमबाग इथून निघाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला (Diksha Bhoomi) भेट दिली. इथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन हार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. यानंतर ते थेट अधिवेशनासाठी विधानभवनाला रवाना झाले.