नागपूर : नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आरोपींनी कौर्याची सीमा गाठत एका टॅक्सीचालक तरुणाचा गळा आवळला आणि मृत समजून फेकून दिलं. अनेक तासानंतर तो जिवंतच असल्याचं लक्षात आल्यावर पुन्हा गळा चिरुन मारलं. टॅक्सी चालकाला पुन्हा मृत समजून आरोपी निघून गेले. काही वेळाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी परत आलेल्या आरोपींना तो जिवंत आढळला आणि त्यावेळी आरोपींनी त्याला जिवंतच जाळलं. काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी शिवारात 14 मे च्या पहाटे ही घटना घडली. अंगद उर्फ बिट्टू कडूकर या टॅक्सी चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.  


नागूपर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील रिधोरा गावात राहणारा टॅक्सी चालक अंगद कडूकर 13 मेच्या संध्याकाळी त्याच्या दोन मित्रांसह काटोलला जेवण करायला गेला होता. जेवणाआधी तिघे एका बंद असलेल्या झुणका भाकर केंद्रात मद्यपान करत असताना, त्यांच्याजवळच आरोपी अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी हे देखील मद्यपान करत बसले होते. अंगदचे दोन्ही मित्र काही काम आल्याने थोड्या वेळासाठी तिथून गेले असताना, अंगदचं तिन्ही आरोपींसोबत शाब्दिक भांडण झालं. आरोपींनी अंगदच्या टॅक्सीमध्येच त्याचे अपहरण केले आणि डोंगरगाव परिसरात घेऊन गेले. रस्त्यात तिन्ही आरोपींनी धावत्या टॅक्सीमध्येच अंगदला बेदम मारहाण केली. बेशुद्ध झालेल्या अंगदला मृत समजून तिन्ही आरोपींनी त्याला सावळी शिवारातील निर्जन ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर अंगदची टॅक्सीही निर्जन स्थानी उभी करुन तिन्ही आरोपी आपापल्या घरी परतले. 


घरी गेल्यानंतर मुख्य आरोपी अक्षय चिगेरियाने दारुच्या नशेत मी एकाची हत्या केल्याचं त्याच्या पत्नीला सांगितलं. अक्षयच्या घाबरलेल्या पत्नीने दोन कौटुंबिक मित्रांना बोलावून नवरा बोलत असलेली बाब तपासण्यासाठी त्यांना अक्षयसोबत सावळी शिवार पाठवलं. अक्षय चिगेरियाने त्यांना अंगद कडूकरला मारुन फेकल्याचं ठिकाण दाखवलं. तिथे मृत समजून फेकलेला अंगद तेव्हाही जिवंत होता आणि वेदनेने विव्हळत असल्याचं दिसलं. अक्षय चिगेरियासोबत तिथे गेलेले दोन्ही कौटुंबिक मित्र जखमी अंगदला रुग्णालयात नेण्याचा विचार करत असतानाच, मुख्य आरोपी अक्षयने जवळचा चाकू काढून सर्वांच्या देखत जखमी अंगदचा गळा चिरला. डोळ्यादेखत अंगदची हत्या झाल्यानंतर अक्षयसोबत तिथे आलेले दोन्ही कौटुंबिक मित्र घाबरुन तिथून पळून गेले. 


अंगद आता तरी मेला असे समजून अक्षय चिगेरिया ही तिथून निघून गेला. मात्र अंगदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या विचारातून त्याने मंगेश जिचकार (आरोपी क्रमांक दोन) आणि गणेश गोंडी (आरोपी क्रमांक 3) यांना सोबत घेऊन दीड लिटर पेट्रोल आणि ट्रकच्या टायरची व्यवस्था केली. तिघे पेट्रोल आणि टायर घेऊन पहाटेच्या सुमारास पुन्हा घटनास्थळी पोहोचले. ते मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याची तयारी करताना त्यांना अंगद पुन्हा हालचाल करताना दिसला. आता तिघांनी कौर्याची परिसीमा गाठत अंगदच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळून टाकले. आरोपींच्या या तिसऱ्या आणि अत्यंत क्रूर प्रयत्नात अंगद कडूकरचा जीव गेला. 


तिकडे पहाटेपर्यंत अंगद घरी परतला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्याची क्वॉलिस टॅक्सी एका निर्जन ठिकाणी आढळून आली, त्यात मारहाणीचे आणि तोडफोडीचे चिन्हे दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. तेवढ्यात सावळी शिवारात पोलिसांना अंगदचा पेटवलेला मृतदेह आढळून आला. विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीचा अभ्यास केल्यानंतर काटोल पोलिसांनी अंगद कडूकरच्या हत्या प्रकरणात अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी या तिघांना अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली आहे.  


सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृत अंगद कडूकर आणि आरोपींची कोणतीही ओळख नव्हती. फक्त मद्यपान करताना झालेल्या शाब्दिक वादातून त्यांनी हे क्रूर कृत्य केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे.