नागपूर : शहरातील सप्तक नगरमध्ये 62 वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. विजयाबाई पांडुरंग तिवलकर यांची 14 मे रोजी संध्याकाळी राहत्या घरी हत्या झाली होती. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची तीक्ष्ण हत्याराने आणि डोक्यावर प्रहार करून हत्या केली होती. घरातील सर्व मौल्यवान वस्तू घरातच असल्याने विजयाबाई यांची हत्या का करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात विजयाबाई यांच्या अल्पवयीन नातीने तिचा बॉयफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या इतर 4 मित्रांच्या मदतीने आजीचा खून केल्याचे समोर आले आहे.


पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बॉयफ्रेंड आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मात्र, आजीच्या हत्येत सहभागी असलेली आरोपी नात अद्याप फरार आहे. आजीकडे खूप संपत्ती असून घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आहे, आजीला संपविले की आपल्याला ती रक्कम आणि संपत्तीवर मौज मजा करता येईल, अशा विचाराने नातीने हे हत्याकांड घडविले. विजयाबाई राज्य राखीव पोलीस दलातून स्वयंपाकी पदावरून 2017 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सप्तक नगर येथील घरी एकट्याच राहत होत्या. त्यांना अमोल नावाचा मुलगा व दोन मुली विवाहित असून सर्व वेगवेगळे राहत आहेत.


शेजारी राहणाऱ्या लोकांनी विजयाबाई यांना गुरुवारी म्हणजेच 13 मे रोजी यांना पाहिले होते, मात्र, शुक्रवारी सकाळपासून त्या कुणाला दिसल्या नव्हत्या. शुक्रवारी दुपारी एक वाजता घरची भांडेधुनी करणारी मोलकरीण जेव्हा आली तेव्हा तिला घरच्या बेडरूममध्ये विजया पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात दिसल्या. त्यांच्या डोक्यावर जखमा होत्या. मोलकरनीने याबाबत विजया यांच्या मुलाला माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना सुद्धा कळविण्यात आले.