नागपूर : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारसमोर ठेवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा मार्च 2019 पर्यत सुरु होईल.

दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी लागणाऱ्या 11 हजार 216 कोटींपैकी 60 टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार यात 20-20 टक्क्यांचा हातभार लावतील.

केंद्र सरकारकडून ही मंजुरी मिळाल्यानंतर नागपुरात मेट्रो रेल सेवेच्या 46.3 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निर्माण कार्याला प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी 46.3 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याला तत्वतः मंजुरी दिली असून या मार्गावर 35 स्टेशन असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्याच्या मार्गांना आणखी पुढे नेण्याचे काम दुसऱ्या टप्प्यात केले जाणार असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील पाच नवे भाग जोडले जाणार आहेत.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील खापरी ते सीताबर्डी दरम्यानची मेट्रो सेवा मार्च 2019 पर्यत सुरु होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पहिल्या टप्पा 38 किमी लांबीचा आहे.
दुसऱ्या टप्प्याची एकूण लांबी 46.3 किमी

दुसऱ्या टप्प्याचा अपेक्षित खर्च 11 हजार 216 कोटी

दुसऱ्या टप्यात 35 स्टेशन्स

मार्ग 1) मिहान ते बुटीबोरी एमआयडीसी - 18 किमी

       2) ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी - 13 किमी

       3) लोकमान्य नगर ते हिंगणा - 6 किमी

       4) पारडी ते ट्रान्सपोर्ट नगर - 5 किमी

       5) वासुदेव नगर ते वाडी - 4 किमी

दुसऱ्या टप्प्याचा सुमारे तीन लाख प्रवाशांना लाभ होणार आहे.

नागपूर मेट्रोची 90 किलोमीटर प्रतितास वेगाने सप्टेंबर महिन्यात चाचणा सुरु करण्यात आली होती. मेट्रोचा सरासरी स्पीड 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असला, तरी एखाद्या पॉईंटला मेट्रो 80 ला पोहचत असते आणि 80 चा स्पीड गाठायचा असेल, तर 90 किलोमीटर प्रतितासाचं यशस्वी टेस्टिंग पूर्ण करावं लागतं.