Continues below advertisement

नागपूर : रेल्वे ट्रॅकवर अनेकदा अपघाताच्या घटना घडतात, काहीजण जाणीपूर्वक रेल्वेखाली आपला जीव देतात. मात्र, कुठेही न थांबणाऱ्या रेल्वेच्या मोटरमनलाही या रेल्वे अपघाताचं मोठं दु:ख असतं. त्यामुळेच, अनेकदा मुके प्राणी, जनावरं रेल्वे ट्रॅकवर आडवे आल्याचे दिसताच रेल्वेचे लोको पायलट गाडीचा वेग कमी करतात, हॉर्न सातत्याने वाजवतात आणि या प्राण्यांना ट्रॅकपासून दूर करतात. रेल्वेच्या चालकांतली ही माणूसकी अनेकदा दिसून येते. आता, नागपूरच्या मेट्रो (Metro) चालकांमध्येही अशीच माणुसकीचं दर्शन दिसून आलं आहे. नागपूरमध्ये (Nagpur) काँग्रेस नगर ते अजनी मार्गावरील मेट्रो ट्रॅकवर सायाळ प्राणी आल्याने एकच खळबळ उडाली होती. चालकाने तात्काळ याबाबत मेट्रोच्या कंट्रोल रुमला कळवले, त्यानंतर वन विभागाला (Forest) माहिती देत साळींदर म्हणजेच सायाळ प्राण्याला पकडण्यात आले.

मेट्रो रेल प्रशासनाला त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेच वनविभाग आणि ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू पथकाला याबाबत सूचना दिली. त्यानंतर ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू टीमने मेट्रो स्टेशन गाठून सायाळ प्राण्याला पकडण्याची मोहीम सुरू केली. शर्थीच्या प्रयत्नानंतर काटे फेकणाऱ्या सायाळ प्राण्याला पकडण्यात वन विभागाला यश आले. वन विभाग आणि ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू टीमने मेट्रो ट्रॅकवर धावणाऱ्या सायाळ प्राण्याला पकडण्याची मोहिम हाती घेतली. मात्र, हा प्राणी अतिशय चपळाईने रेक्यू टीमला हुलकावणी देता होता, काही केलं सायाळ हाती येत नव्हता. त्यामुळे रेस्क्यू टीम कधी मेट्रोत बसून ट्रॅकवर समोर जात होती आणि मग खाली उतरून सायाळला पकडण्याचे प्रयत्न करत होती. तर कधी त्याच्या मागे धावत होती. मात्र, एक तास उलटल्यानंतरही तो सायाळ रेस्क्यू टीमच्या हाती लागत नव्हता.

Continues below advertisement

मेट्रो ट्रॅकवर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेवाळ असल्यामुळे मेट्रोचा एक कर्मचारी पाय घसरून पडला आणि त्याला हाताला, पायाला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याची दुर्घटनाही यादरम्यान घडली. तब्बल 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू टीम आणि मेट्रोचे कर्मचाऱ्यांनी त्या सायाळ प्राण्याला पकडल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. सायाळला पकडण्यात यशस्वी ठरल्यानंतर रेस्कू टीमने त्याला ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेले आहे. तर, मेट्रोच्या जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पकडण्यात आलेल्या सायाळला वन विभागाकडून पुन्हा जंगलात सोडून देण्यात येईल, अशी माहिती आहे.

हेही वाचा

अंगावरचं पांघरुन सुद्धा गेलं, काहीच राहिलं नाही; पुरामुळे शाळेत स्थलांतरीत, आजी-आजोबानं फोडला टाहो