नागपूर : नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांची भूमिका योग्य नाही ते राजकारण करत असल्याचा आरोप भाजप शहर अध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. पालकमंत्र्यांना लॉकडाऊनच्या निर्णयप्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सहभागच नको असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तसेच प्रस्तावित लॉकडाऊन टाळण्यासंदर्भात नागरिकांनी काय करावे, कसे वागावे या विषयावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून शहरात केल्या जाणाऱ्या जनजागृतीच्या कामातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच वादाचा मुद्दा ठरलेला प्रस्तावित लॉकडाऊनचा निर्णय आणखी चिघयलण्याची शक्यता आहे.
एबीपी माझाशी बोलताना आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले की शुक्रवारी महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे भाजप लॉकडाऊन संदर्भात जनजागृती करण्यासाठी राजकीय विचार बाजूला ठेऊन एकवेळ पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ही काम करण्यास तयार होती आणि आजही आहे. मात्र, पालकमंत्र्यांनाच लॉकडाऊन लावायचे की नाही याच्या निर्णयप्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सहभाग नको आहे. नागपूरात लॉकडाऊन करावे की नाही, त्याची खरोखर गरज आहे की नाही, हे फक्त प्रशासन ठरवेल अशीच नितीन राऊत यांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही भाजपचे लोकप्रतिनिधी लॉकडाऊन टाळण्यासंदर्भात आजपासून सुरू होणाऱ्या जनजागृतीच्या कामातून बाजूला होत असल्याचे दटके यांनी सांगितले.
विशेष म्हणजे दोन दिवसांच्या जनता कर्फ्युनंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लॉकडाऊन संदर्भात जनजागृती करण्यासाठी फिरतील असे काही दिवसांपूर्वी महापौरांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठरले होते. मात्र, कालच पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन संदर्भात घेतलेल्या वेगळ्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात सर्वकाही प्रशासन ठरवणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्याच बैठकीत विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय प्रशासनिक समिती ही स्थापन करण्यात आली.
त्यामुळे भाजपने या मुद्द्यावर जनजागृतीच्या प्रक्रियेतून फारकत घेतल्याचे जाहीर केले आहे. मात्र, भविष्यात नागपूरच्या जनतेवर लॉकडाऊन लादले जाणार असेल तर भाजप आंदोलनात्मक भूमिका स्वीकारेल असे संकेतही दटके यांनी दिले. जनतेवर बळजबरीने लॉकडाऊन थोपू नका, त्याची आवश्यकता खरच आहे का? त्याच्यातून काही साध्य होणार आहे का? याचा ही विचार करा असा सल्ला दटके यांनी दिला.
दरम्यान, आधीच लॉकडाऊन लावण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर मतमतांतर असताना आता नागपुरात महापालिकेत सत्ता असलेली भाजप या प्रकारणात बहिष्काराच्या भूमिकेत आल्याने प्रस्तावित लॉकडाऊनचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
नागपूर शहरात प्रस्तावित लॉकडाऊनसंदर्भात पालकमंत्र्यांची भूमिका योग्य नाही, ते राजकारण करताहेत : भाजप
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
29 Jul 2020 09:05 AM (IST)
आधीच लॉकडाऊन लावण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर मतमतांतर असताना आता नागपुरात महापालिकेत सत्ता असलेली भाजप या प्रकारणात बहिष्काराच्या भूमिकेत आल्याने प्रस्तावित लॉकडाऊनचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -