Nagpur Crime : प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 28 वर्षीय युवकाने वडिलांच्या मृत्यूमुळे मानसिक तणावात असल्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळी पावणेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ऋत्वीक सुनील जावळेकर (वय 28, रा.ले-आउट, अद्वैत अपार्टमेंट प्रतापनगर) असे युवकाचे नाव आहे. 


पोलिसांनी (Nagpur Police) दिलेल्या माहितीनुसार चार वर्षांपूर्वी ऋत्विकचे वडील सुनील जावळेकर यांचे निधन झाले. ते दंतरोगतज्ज्ञ होते. त्यांच्या मृत्यूने तो प्रचंड मानसिक तणावात होता. ऋत्विकची आई रश्‍मी याही दंतरोगतज्ज्ञ आहेत. ऋत्विकनं अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या विधी शाखेच्या प्रवेशाची तयारी करत होता. काल रात्री जेवण केल्यावर तो आपल्या खोलीत गेला. मात्र, आज सकाळी तो दार उघडत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना त्याची माहिती दिली. तसेच राहुल मोटे (वय 59, रा. रेशीमबाग) यांनाही त्यांनी बोलावून घेतले. त्यांनी दार तोडून उघडले. यावेळी ऋत्विकने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची सूचना प्रतापनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविला. यावेळी राहूल मोटे यांनी दिलेल्या सूचनेवरुन प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 


लिपस्टीक लावून तरुणीने घेतला जगाचा निरोप


काही दिवसांपूर्वी एका तरुणीने संपूर्ण चेहऱ्यावर लिपस्टिक लावून आत्महत्या केली होती. सानिका प्रवीण लाजूरकर, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नीट परीक्षेची तयारी करत होती. ही घटना बेलतरोडी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पृथ्वीराज नगरातील शिव हाइट्स येथील पाचव्या माळ्यावर उघडकीस आली होती. सानिकाचे वडील प्रवीण हे वर्धा येथील कंपनीत व्यवस्थापक असून, आईही वर्धेतीलच महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. सानिका ही फ्लॅटमध्ये राहायची. गेल्या काही दिवसांपासून सानिका तणावात होती. सोमवारी मध्यरात्री ती आई-वडिलांसोबत बोलली. त्यानंतर तिने चेहऱ्यावर लिपस्टिक लावली आणि पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला होता.


अलिकडे वाढल्या घटना...


अलिकडे देशात तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तरुणांच्या आत्महत्यांमध्ये मानसिक तणाव किंवा पालकांनी रागावल्याने तरुणांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षभरात नागपुरातही अनेक घटना घडल्या होत्या. मोबाईलवर बोलत असल्याने पालकांनी रागावल्यामुळे एका तरुणीने आपली जीवनयात्रा संपविली होती. तर दुसरीकडे पालकांनी गेम खेळण्यासाठी फोन न दिल्याने शाळकरी मुलीने आत्महत्या केली होती.  आत्महत्यासारखे विचार मनात आल्यास तरुणांनी आपल्या पालक किंवा मित्रांशी बोलावे, तसेच गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.


ही बातमी देखील वाचा...


अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाला नागपुरात अटक; आई जाब विचारण्यासाठी गेली तर...