नागपूर : नागपूर जिल्हा गरिबांच्या हक्काच्या रेशनाची काळाबाजारी करण्याचा हॉटस्पॉट बनला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसात गरिबांच्या हक्काचे हजारो किलो धान्य रेशन दुकानदारांकडून काळाबाजार करण्यासीठी इतरत्र साठवल्याचे उघडकीस आले आहे.  नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील गडेगावमध्ये मर्यादेपेक्षा जास्त धान्यसाठा करून काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात काल रात्री कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. चेतन दिवेवार ( 35 ) आणि हरिशचंद्र दिवेवार असे आरोपींचे नावे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार सावनेरचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना गडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून रेशनमढी धान्याची काळाबाजार केली जात असल्याची माहिती मिळाली. जेव्हा महसूल विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा चेतन दिवेवार या स्वस्त धान्य दुकानदाराने त्याच्या दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या हरिशचंद्र दिवेवार यांच्या घरी रेशन मधील धान्याचा साठा केल्याचे आढळले.

नागपुरात रेशन मालाचा काळाबाजार उघड, गरीबांचा घास हिरावणाऱ्या दुकानदाराविरोधात गुन्हा
चौकशीत हे धान्य इतरत्र साठवून त्याचा काळाबाजार केले जाणार असल्याचे समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली. हरिश्चंद्र दिवेवार यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात शासकीय रेशनिंगचे प्रत्येकी 50 किलो तांदळाच्या 90 बॅग्स आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांना सूचना देऊन स्वस्त धान्य दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.


 दरम्यान, रोजच नागपूर जिल्ह्यात कुठल्यातरी भागातून रेशनच्या धान्याच्या काळाबाजारीच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी पारशिवनी तालुक्यातील काही रेशन दुकानावर स्वतः छापा घालून तिथला सावळा गोंधळ समोर आणला होता. तर दोनच दिवसापूर्वी नागपूर ग्रामीण पोलिसांनी सिल्लेवाडा मधील एका रेशन दुकानातून 4 हजार किलो तांदूळ काळाबाजारीसाठी वेगळ्या ठिकाणी साठवल्याचे उघडकीस आणले होते. त्यामुळे नागपूर जिल्हा गरिबांच्या हक्काच्या रेशनाचा काळाबाजार करण्याचा हॉटस्पॉट बनला आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.