नागपूर (Nagpur) : नागपुरातील महापुराला (Nagpur Flood) 72 तास उलटले आहेत आणि पूरबाधित वस्त्यांमध्ये हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र पुराच्या पाण्यासह रहिवासी वस्त्यांमध्ये चिखल (Mud) एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की 72 तासानंतरही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करुन रस्त्यावरचा, गल्ल्यांमधला, लोकांच्या अंगणातला चिखल काढावा लागत आहे. पूर ओसरल्यानंतर चिखलामुळे रोगराई (Disease) निर्माण होऊ नये यासाठी औषध आणि ब्लिचिंग पावडरची फवारणीही केली जात आहे.


दरम्यान पुराच्या दिवसानंतर ज्या पद्धतीने महापालिका, वीज मंडळ आणि इतर विभागांनी अंबाझरी लेआउट मध्ये येऊन मदत केली. काही नागरिकांनी प्रशासनाचे त्या संदर्भात कौतुकही केले आहे. पुराचा दिवस अत्यंत वाईट होता. मात्र दुसऱ्या दिवसापासून प्रशासनाने मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. काल आमच्या वस्तीतील पंचनामेही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुरेशी नुकसान भरपाई मिळावी अशी सरकारकडून अपेक्षा असल्याचे मत अंबाझरी लेआऊटमधील नागरिकांनी व्यक्त केले आहे.


मोठी दुर्घटना होण्याची वाट महापालिका पाहत होती का? : अंबादास दानवे


दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंबाझरी लेआऊट इथे पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. काही कुटुंबीयांशी संवादही साधला. यानंतर ते म्हणाले की, "अनेक घरातील कुटुंबियांना स्थलांतरित व्हावं लागलं, भयावह परिस्थिती होती, नियोजनाचा अभावच विषय दिसतोय, मोठ्या घोषणा होत्या, पण काम होत नाही. भिंत खिळखिळी झाली आहे, काम करताना टप्प्याटप्प्यात काम झालं पाहिजे. एक टक्का पूर्ण करुन बाकीचे काम झाले, मोठी दुर्घटना होण्याची वाट महानगरपालिका पाहत होती का? दिल्ली, मुंबईत अशा पद्धतीने मोठ्यामोठ्या गप्पा मारत आहेत, हे नागपूरकरांचे दुर्दैव आहे." 


नागपुरात ढगफुटीसदृश्य पाऊस


उपराजधानीत शनिवारी पहाटे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. तब्बल चार तास शहरात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. अवघ्या चार तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. या पावसामुळे नागपूर जलमय झाले व शहरात हाहाकार माजला. काही परिसरात तब्बल सहा फुटापर्यंत पाणी साचलं होतं. शहरातील 10 हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी घुसले. अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 


अंबाझरी तलाव फुटणार? 


नागपूरमध्ये शनिवारी आलेल्या जलप्रलयाने शेकडो कुटुंबांची स्वप्न अक्षरश: वाहून गेली. या महापुराने पाच जणांचं आयुष्य वाहून गेलं. पण त्या चिखलातून संसार बाहेर काढताना आता नागपूरकरांच्या डोळ्यांत अश्रूंसोबत प्रचंड दहशतही साचली आहे. या दहशतीचं नाव आहे अंबाझरी तलाव. 8 टीएमसी क्षेत्रफळ आणि 28 हेक्टरमध्ये पसरलेला अवाढव्य तलाव. नागपूरची तहान भागवणाऱ्या याच तलावाने आता नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. नागपूरच्या दिशेने तलावाची सुमारे 900 मीटरची मातीची संरक्षण भिंत भलतीच कमकुवत झाल्याचं तज्ञांना वाटतं. अंबाझरी तलावातून नाग नदीच्या प्रवाहात काही प्रमाणात पाणी आल्यानंतर नागपूर शहरातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. जर अंबाझरी तलावाची मातीची संरक्षण भिंत कमकुवत झाली तर वर्षातील 8 ते 10 महिने काठोकाठ भरलेल्या अंबाझरी तलावातून आठ टीएमसी पाणीसाठा नागपूर शहराच्या दिशेने येईल आणि त्यामुळे हाहाकार माजेल असे तज्ञांना वाटतं आहे.


हेही वाचा


Nagpur Ambazari Lake : खडकवासला धरणाच्या दुर्घटनेची नागपूरमध्ये पुनरावृत्तीची भीती;अंबाझरी तलावाच्या संरक्षण भिंतीची दूरवस्था