नागपूर : जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन असून लोकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर निघू नये असे बंधन आहे. मात्र, लोकं लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करत सर्रास बाहेर पडताना दिसत आहेत. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूर बाहेर असलेल्या पर्यटन स्थळावर जाणे शेख कुटुंबाला फारच महागात पडले. 

कारण तलावाकाठी मुलाचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या शेख कुटुंबातील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अब्दुल असिफ शेख (35 वर्ष) आणि शहबील अब्दुल असिफ (12 वर्ष) या दोघांचा समावेश असून ते दोघे नात्याने पिता पुत्र आहेत. नागपूरच्या टिपू सुलतान चौक परिसरात राहणाऱ्या शेख दाम्पत्याला दोन मुले आहेत. त्यापैकी एका मुलाचा आज वाढदिवस होता. सध्या दुकान, व्यवसाय बंद असल्याने शेख कुटुंबाने लाडक्या मुलाचा वाढदिवस नागपूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव झिलपी तलावाच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात साजरा करण्याचे ठरविले. 

कुटुंब मोहगाव झिल्पी तलावाजवळ पोहोचले. सर्वांनी केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांनतर पिता पुत्र तलावातील पाण्यात उतरले. मात्र, त्यांचे पाय पाण्यातील गाळात फसल्याने ते पाण्यात बुडाले, हे चित्र पाहून पत्नीही तलावात उतरली आणि समोर जाऊन पती आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच वेळी तलावाच्या काठावर उपस्थित असलेल्या काहींनी हे दृश्य पाहिले. त्यांनी पत्नीला वाचविले. मात्र, अब्दुल आणि शहबीलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून ते उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.