नागपूर : हाणामारी, चोरी, लूट, खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांसाठी राज्यात नेहमीच चर्चेत असणाऱ्या उपराजधानी नागपुरात गेल्या तीन दिवसात हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. तर गेल्या बारा दिवसात नागपूर आणि जवळपासच्या परिसरात हत्येच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपुरात नवीन वर्ष रक्तरंजीत ठरताना दिसत आहे.


नागपूरमध्ये मंगळवारी भाजी बाजारात काल सायंकाळी अक्षय उर्फ गोलू निर्मले या भाजी विक्रेत्याचा धारधार शस्त्राने हत्या झाली. भाजी विक्रेतेच्या अचानक झालेल्या हत्याकांडामुळे एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार मृत अक्षय निर्मले हा मंगळवारी बाजारात एका ठिकाणी दुकान लावू पाहत होता. तर त्याच जागेवर बाजारात आधीपासून दुकान लावणाऱ्या वर्मा बंधूंचा डोळा होता. अक्षय निर्मले आणि वर्मा बंधू हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने त्यांच्यातला जागेचा वाद काल संध्याकाळी अचानक विकोपाला गेला.


रागातून मित्राची गाडी पेटवली, आजूबाजूच्या दहा दुचाकीही जळून खाक; पिंपरी चिंचवडमध्ये जळीतकांड


वर्मा बंधूनी इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने अक्षयची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात रोजच हत्येच्या घटना घडत आहेत. 10 जानेवारीला अजनी भागात सुमित पिंगळे या गुंडाची हत्या झाली होती. तर 11 जानेवारीला माजरी भागात पान टपरी चालक रियाजुद्दीन अन्सारीचा खून झाला होता. काल 12 जानेवारीला पुन्हा मंगळवारी बाजारात विक्रेत्याच्या हत्येची घटना घडल्याने नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.


धक्कादायक बाब म्हणजे 2020 मध्ये नागपुरात जवळपास शंभर खून झाले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने 2020 च्या कटू आठवणी 2021 मध्ये राहणार नाही असे वाटत असताना 2021 च्या पहिल्या बारा दिवसात नागपूर शहर आणि जवळपासच्या भागात हत्येच्या आठ घटना घडल्या आहेत. त्यामुळे जरी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचा प्रशस्तीपत्र पोलिसांना देत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. नागपुरात पहिल्या बारा दिवसांचे आकडे तेच सांगत आहे.


नागपुरात जानेवारी महिन्यात घडलेल्या हत्येच्या घटना


5 जानेवारी 2021
कुही पोलीस स्टेशन अंतर्गत चाफेगडी भागात राजकुमार गेडाम यांची कुऱ्हाडीने वार करून मुलानेच हत्या केली.


7 जानेवारी 2021
खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत महाराजा लॉजमध्ये 27 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तपासात तिच्या मैत्रिणीने हत्या केल्याचा गुन्हा दाखल.


8 जानेवारी 2021
कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत 15 वर्षीय बालकाची जुन्या भांडणातून चाकूने हत्या, धक्कादायक म्हणजे हत्या करणाऱ्या तीन आरोपींमध्ये 2 अल्पवयीन होते.


8 जानेवारी 2021
कामठी पोलीस स्टेशनअंतर्गत कुंदन रंगारी या तरुणाची दारू पिण्यासाठी ग्लास व पाणी दिले नाही म्हणून हत्या.


8 जानेवारी 2021
काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत संकेत तायडे या तरुणाच्या दगडाने ठेचून झालेल्या मृत्यू प्रकरणात तपासाअंती हत्येचा गुन्हा दाखल.


10 जानेवारी 2021
अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत सुमित पिंगळे या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाची कटींग सलूनमध्ये हत्या. या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून बाप लेकाचा समावेश.


11 जानेवारी 2021
यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत रियाजुद्दीन अन्सारी पानटपरी चालकाची शेजारील पानटपरीवाल्या सोबतच्या वादातून हत्या.


12 जानेवारी 2021
सादर पोलीस स्टेशन अंतर्गत मंगळवारी बाजारात अक्षय निर्मले या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाची दुकानाच्या जागेच्या वादातून हत्या.