नागपूर : एखादा सराईत गुन्हेगार (Nagpur Crime) गुन्हा करत असताना काय थराला जाऊ शकतो यांचे अनेक उदाहरण आपण ऐकत अथवा वाचत असतो, मात्र नागपुरात घडलेल्या एक चोरीच्या ( Strange Thief ) प्रकरणाने नागपूर पोलीस ( Nagpur City Police) देखील चक्रावून गेले आहेत. त्यामागील कारण देखील तितकेच विचित्र आहे. तर झाले असे की एका सराईत गुन्हेगाराने चोरीच्या पैशातून आलिशान घर बांधले खंर, मात्र घरात टीव्ही नव्हता म्हणून ही उणिव भरून काढण्यासाठी मोठे पाऊल उचलले. त्याने चक्क दोन घरी घरफोडी करून मोठा एलईडी टीव्ही चोरल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत घडला आहे. तपासातून उघड झालेल्या या प्रकारामुळे पोलीसदेखील आश्चर्य व्यक्त करत आहे. या प्रकरणातील आरोपी शेख फिरोज उर्फ ​​पक्याला अटक करण्यात आल्याने आरोपीची मात्र टीव्ही बघण्याची हौस अपूर्णच राहिली आहे.

  


चोरीच्या पैशातून बांधले घर, मात्र घरात टीव्ही नाही म्हणून केली घरफोडी


नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्यातर्गत (Wathoda Police Station) रहिवासी असलेले शेषराव बिसने आणि पुंडलिक शेंडे हे दिवाळी निमिती सुट्ट्या असल्याने बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपी शेख फिरोज उर्फ ​​पक्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने या संधीचे सोने करत घरफोडी करण्याचा धाडसी निर्णय केला. सुदैवाने बिसने आणि शेंडे यांनी आपल्या घरात रोख रक्कम व मौल्यवान दाग-दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवले असल्याने चोरांनी त्याला हात लावला नाही. मात्र चोरट्यांना घरतील इतर सर्व साहित्य चोरण्यात त्यांना यश आले. शेषराव बिसने आणि पुंडलिक शेंडे हे गावावरून परतल्या नंतर आपल्या घरात झालेल्या चोरीचा प्रकार त्यांच्या लक्ष्यात आला आणि त्यांनी लगेच पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेत पुढील तपास सुरू केला. 


टीव्हीच्या नादात केली चोरी: मात्र हौस पूर्ण होण्यापूर्वीच झाली तुरुंगात रवानगी 


दरम्यानच्या काळात आरोपीने चोरून आणलेले सर्व साहित्य आपल्या घरी सजवून देखील लावले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास करतांना या भागात असलेल्या सराईत गुन्हेगार शेख फिरोज यांच्यावर संशय असल्याने पोलिसांनी त्याकडे तपासाचा मोर्चा वळवला.पोलिस शेख फिरोजच्या घरी गेले असतांना त्याच्या घरात चोरीचे सामान आढळून आले. या सामानाची खातरजमा केल्याने पोलिसांचा शक खरा ठरला. या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी शेख फिरोज उर्फ ​​पक्या याला अटक केली असून त्याने हि चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरीच्या घटनेत फिरोजसह त्याचा एक साथीदार ऋषिकेश बाडवाईक हा देखील आरोपी आहे.सध्या ऋषिकेश फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 


फिरोज हा एका सराईत गुन्हेगार असून त्याने आजपर्यंत अनेक चोऱ्या केल्या आहेत. तसेच त्यावर चोरीचे अनेक गुन्हे देखील दाखल आहे. आजवर केलेल्या चोरीच्या घटनेतून फिरोजने आलिशान घर बांधले होते मात्र घरात सामान नसल्याने त्याला ती उणीव जाणवत होती. परिणामी त्याने हे टोकाचे पाऊल उचलेले. मात्र घरात लावलेल्या या चोरीच्या सामानाची हौस पूर्ण होण्या आधीच पोलिसांनी आरोपी शेख फिरोज उर्फ ​​पक्याला अटक केली आहे.