नागपूर: रेल्वेचे तिकीट ( Indian Railway) नसल्याने टीसी कडून आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी एका तरुणाने चक्क धावत्या रेल्वेमधून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने रेल्वेचा वेग कमी असल्याने या घटनेत तरुणाचा जीव बचावला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. महेश संतोष सोनी असे या जखमी तरुणाचे नाव असून तो मूळचा रिवा येथील रहिवासी आहे.
ही थरारक घटना मंगळवारी 21 नोव्हेंबर दुपारच्या सुमारास घडली आहे. गोंदिया -कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूरातील कामठी स्टेशन हद्दीत आली असता महेशने चालत्या रेल्वेतून उडी मारली होती. या थरारक घटनेमुळे महेश गंभीर जखमी झाला असून सध्या त्यावर नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे.
धावत्या ट्रेन मधून घेतली उडी
दिवाळीच्या निमित्याने महेश आपल्या कुटुंबीयासोबत रिवा या आपल्या मुळगावाला गेला होता. दिवाळी सण साजरा करून तो नागपूरला आपल्या आई वाडिलांसोबत महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूरला परत येत होता. दरम्यान गाडी कामठी परिसरात आली असताना तिकीट निरीक्षक नेहमी प्रमाणे प्रवाशांचे तिकीट तपासात होते. मात्र सोनी कुटुंबीयाकडे तिकीट नसल्याने त्याची एकच तारांबळ उडाली. अशातच धावत्या ट्रेनमध्ये तिकीट निरीक्षक (टीसी) ने सोनी कुटुंबीयांकडे तिकिटाची विचारणा केली. तिकिट नसल्याने महेश एकदम घाबरला. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच पोलीस आपल्यावर कारवाई करतील या भीतीने महेश अधिक भयभीत झाला. परिणामी महेशने धावत्या ट्रेनमधून खाली उडी घेतली.
या थरारक घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र कुणीही धोक्याचे संकेत देणारी डब्यातील साखळी ओढण्याचे प्रसंगावधान न दाखवल्याने ट्रेन तशीच पुढे निघून कामठी स्थानकावर गेली. त्यानंतर माहेशच्या आईवडिलांकडून आरडाओरड सुरू केल्याने रेल्वे सुरक्षा दलाने खाली पडलेल्या तरुणाकडे धाव घेत त्यांची तात्काळ उपचारसाठी रवानगी करण्यात आली.
दैव बलवत्तर म्हणून बचावला जीव
वय वर्ष 23 असलेला महेश रिवा येथे एमएससी करतो, तर त्याचे आईवडील दत्तवाडी भागात मोलमजुरी करतात. सर्वसाधारण परिस्थिती असलेले सोनी कुटुंबीय रोजगाराच्या शोधात नागपूर येथे आले होते. रिवा येथील राहत्या घरी दिवाळी आटपून महेश आपल्या आई वाडिलांसोबत नागपूरला परतत होता. रेल्वेचे तिकीट नसताना नेमके तिकीट निरीक्षकाने महेशला पकडले . तिकीट निरीक्षक दरडावणीची भाषा करत असल्यामुळे तो कारागृहात डांबणार, अशी भीती महेशला वाटल्याने त्याने हे धोक्याचे पाऊल उचलेल. दैव्य बलवत्तर म्हणून याच वेळी कामठी रेल्वे स्थानक जवळ असल्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला होता. त्यामुळे या थरारक घटनेत महेशचे प्राण वाचले. या घटनेत महेशला प्रथम रेल्वे रुग्णालयात आणि त्यानंतर नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.