नागपूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला (Shinde Committee) राज्य सरकारने अहवाल सादर करण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. शासन निर्णय 3 नोव्हेंबर 2023 नुसार राज्यातील
  मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर इतरत्र विशेष कक्ष स्थापन केले आहे. तसेच या कक्षाला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश  निवृत्त न्यायमूर्ती तथा गठित समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर  कुणबी मराठा जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती उद्या बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023  पासून अमरावती ( Amravati ) आणि नागपूर ( Nagpur ) दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये अमरावती येथील विभागीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुणबी नोंदी तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर दिनांक 23 नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेण्यात येणार आहे. 

 

राज्य सरकारने मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कसा मागास आहे, या समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकरीमध्ये कसे आरक्षण देता येईल यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली असून ही समिती सध्या राज्याच्या दौर्‍यावर आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत असताना सरकारने हालचालींना वेग आणला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती सध्या विदर्भाच्या दौऱ्यांवर आहे.  22 नोव्हेंबरला ही समिती अमरावती येथील पडताळणी आटोपल्यानंतर 23 नोव्हेंबरला पुन्हा नागपुरात प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत बैठक घेणार आहे. मराठा समाजाला मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी, तसेच नोंदी प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत. ज्यामध्ये मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयस्तरावरील  पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंद पत्रक, कोतवाल बुकांची नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणी करण्यात येत आहे. अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार 1948 ते 1967 या कालावधीतील नोंदी तपासण्यात येत आहेत. यापूर्वी  या तपासणीमध्ये मराठा- कुणबी, कुणबी- मराठा अशा अनेक नोंदी आढळल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अधिक नोंदी शोधण्याचे काम सध्या राज्यभर सुरू आहे. 

>> असा असेल समितीचा दौरा 


> अमरावती विभाग (अमरावती, यवतमाळअकोला, वाशिम व बुलडाणा) – बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे बैठक होणार आहे.

> नागपूर विभाग (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली ) – गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे बैठक होणार आहे.

> कोल्हापूर व सांगली – मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.

> पुणे विभाग ( पुणे, सातारा व सोलापूर) – बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बैठक होणार आहे.

> नाशिक विभाग (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार) – शनिवार दि. 2 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे बैठक होणार आहे.

> सिंधुदुर्ग व रत्नागिरी – सोमवार दि. 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे बैठक होणार आहे.

> कोकण विभाग ( मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड) – गुरुवार दि. 14 डिसेंबर 2023 सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे बैठक होणार आहे. या प्रमाणे दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.