नागपूर : भाजप कार्यकर्त्या सना खान हत्याकांड (Sana Khan Murder Case) प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सना खान यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादवला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अजून सापडलेला नाही. अमित साहूला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. त्यानंतर 2 ऑगस्टला त्यांच्यात भांडण झालं. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. मात्र, महेंद्र यादवला अटक केल्यामुळे बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे. एक मृतदेह सापडला असून तो सनाचा नसल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. त्याची डीएनए चाचणी होणार आहे.
'त्या' मृतदेहाची डीएनए चाचणी होणार
भाजप नेत्या सना खान (Sana Khan) यांच्या मृतदेहाचा शोध अद्यापही सुरु आहे. मध्य प्रदेशातील एका महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता, हा मृतदेह सना खान यांचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांचा नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे सना खान प्रकरणातीस गूढ अजून वाढलं आहे. हरदा जिल्ह्यातील शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांच्याशी मिळताजुळता असल्याचं वाटत असल्यामुळे नागपूर पोलिसांनी याप्रकरणी डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील अहवाल समोर आल्यावर पुढील माहिती समोर येईल.
विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता. ही विहीर जबलपूरपासून तीनशे किलोमीटर अंतरावर आहे. हा मृतदेह नागपूर भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेहावरील कपडे सना खान यांनी अखेरच्या दिवशी घातलेल्या कपड्यांसारखे दिसत असल्यामुळे तशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र संबंधित मृतदेह सना खान यांचेच आहे हे अजून स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यामुळे नागपूर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांच्यासोबत सना खान यांचे कुटुंबीय देखील होते. मात्र संबंधित मृतदेह हा सना खान यांचा वाटत नसल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे.
मुख्य आरोपी अमित साहूला अटक
सना खान प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहूला याआधी अटक करण्यात आली होती. सना खान प्रकरण नागपूर पोलिसांनी आधीच संशयित आरोपी अमित साहूच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.