नागपूर : नागपुरात एका कुंटणखाण्यातून पळून गेलेल्या 14 वर्षीय मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी नागपूरच्या गंगा-जमुना वारंगणांच्या वस्तीमध्ये छुपे भुयार असल्याचं समोर आलं आहे. या तळघरांमध्ये अल्पवयीन मुलींना लपवलं जात असल्याचं समोर आले आहे. तसंच खरेदी करुन आणलेल्या अल्पवयीन मुलींना देहविक्रीच्या चिखलात उतरवण्यासाठी आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी या तळघरात कोंडलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी एका कुंटणखान्यातून पळून गेलेल्या 14 वर्षीय मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर जेव्हा त्या आणि इतर काही कुंटणखान्यावर छापे घातले. तेव्हा पलंगाच्या खाली, जमिनीत, दोन भिंतींच्या दरम्यान अनेक भुयार आणि तळघर सापडले आहे. या भुयार आणि तळघरांमध्ये अल्पवयीन मुलींना पोलिसांच्या छाप्यात लपवले जात होते. तसेच खरेदी करून आणलेल्या अल्पवयीन मुलींना देहविक्रीच्या चिखलात उतरविण्यासाठी त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या उद्दिष्टाने अनेक तास या भुयार किंवा तळघरात कोंडले जात होते असल्याचे देखील समोर आले आहे.. आज पोलिसांनी गंगाजमुना वस्तीच्या मध्यस्थानी असलेल्या एका कुंटणखान्यात जेव्हा छापा घातला तेव्हा भिंतीच्या आत मध्ये दोन फूट रुंद आणि सहा फूट लांबीचे एक भुयार सापडलं. या भुयारात पोलिसांच्या छाप्याच्या वेळेला तीन ते चार अल्पवयीन मुलींना कोंडले जायचे.
तर दुसऱ्या एका कुंटणखान्यात पलंगाच्या खाली एक भुयार सापडले असून सहा फूट रुंद आणि सुमारे आठ फूट उंचीच्या या भुयारात पोलिसांच्या छाप्याच्या वेळेला आठ ते दहा अल्पवयीन मुली तासनतास उभे राहून लपायच्या. विशेष म्हणजे या तळघर आणि भुयाराचा वापर काही तडीपार आणि फरार गुन्हेगार पोलिसांपासून लपण्यासाठी करायचे. त्यासाठी कुंटणखान्यांचे मालक त्या गुन्हेगारांकडून वेगळे पैसे मोजायचे अशी माहितीही पोलिसांच्या या तपासात समोर आली आहे.
विशेष म्हणजे ज्या 14 वर्षीय मुलीने आज पोलिसांना या छुप्या भुयार आणि तळघरांची माहिती दिली. त्या मुलीला गंगा जमुनामधील एका कुंटणखान्यात तब्बल वीस लाखात खरेदी करण्यात आले होते. मात्र पाच सहा महिने अत्याचार सहन केल्यानंतर ही 14 वर्षीय मुलगी कुंटणखान्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरली होती. तिच्या मागे कुंटणखान्यातील दलाल लागले असल्यामुळे तिने पुन्हा नागपूर गाठून संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. आज तिच्या धाडसामुळे हे सर्व गैरप्रकार समोर आले आहे.