नागपूर : नागपूरात भुपेंद्रसिंग उर्फ बॉबी माकन यांच्या बहुचर्चित हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 25 एप्रिल रोजी बॉबी यांचे अपहरण झाले होते. 26 एप्रिल रोजी बॉबी यांचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पुलाच्या खाली आढळून आला होता.

तेव्हापासून पोलीस या अपहरण आणि खून प्रकरणाचा तपास करत होते. आता पोलिसांनी या प्रकरणात चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार लोहिया, गुरमितसिंग उर्फ बाबू खोकर, हरजीतसिंग उर्फ सिट्टू गौर, मनिंदरसिंग उर्फ हनी चंडोक यांचा समावेश आहे. मनजीत वाडे नावाचा पाचवा आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात या हत्याकांडामागचे मुख्य कारण गुन्हेगारांमधील आपापसातील संघर्ष असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये या हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार गुरुचरण लोहिया याच्यावर त्याच्याच ऑफिस बाहेर फायरिंग झाली होती. ती फायरिंग मृतक बॉबीने केली असल्याचा संशय लिटिल सरदारला होता.

या शिवाय फरार आरोपी मनजीतसिंग वाडे याच्या ऑफिसमध्ये चालणाऱ्या रमी क्लबमध्ये मृतक बॉबीच्या सांगण्यावरून पोलिसांनी रेड केल्याचा त्याला संशय होता. याच रागातून आरोपींनी सुरुवातीला बॉबीचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केली असल्याची माहिती आहे.